नवशक्तीपैकी ‘ब्रम्हचारिणी’ हे दुर्गेचे दुसरे रूप आहे . नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या या रूपाची आराधना केली जाते. येथे ‘ब्रह्म’ या शब्दाचा अर्थ तपस्या आहे. ब्रम्हाचारिणी म्हणजे तपाचे आचरण करणारी. या देवीचे रूप अतिशय देखणे आणि भव्य आहे.तिच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू असतो.देवी ब्रह्मचारिणी हे साक्षात् ब्रह्माचे रूप आहे असे मानले जाते.
हजारो वर्षे अत्यंत कठोर तपाचरण केल्यामुळे दुर्गा देवीच्या या स्वरुपाला ब्रह्मचारिणी असे नाव पडले. देवीने कठोर तपाचरणाने महादेव शिवशंकराला प्रसन्न करून घेतले. एक हजार वर्षापर्यंत तिने फळे खाऊन तपश्चर्या केली. उपवास काळात तिला ऊन आणि पावसाचा भयानक त्रास सहन करावा लागला होता. या तपश्चर्येनंतर तिने केवळ जमिनीवर पडलेली बेलपत्रे खाऊन दिवस काढले. यानंतर सुकलेले बेलपत्र खायचे सोडून दिल्यामुळे तिला ‘अपर्णा’ हे एक नाव पडले.ब्रह्मचारिणी देवीच्या शुभाशिर्वादामुळे तप, जप, ज्ञान, वैराग्य, त्याग, संयम आणि धैर्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.जीवनातील खडतर संघर्षातही मन विचलित होऊ नये, हा या देवीच्या कथेचा गाभा आहे. माता ब्रह्मचारिणी देवीच्या कृपेने सर्व सिद्धी प्राप्त होतात. असे म्हणले जाते.
ब्रह्मचारिणी देवीचे उपासना केली असता स्वाधिष्ठान चक्र जागृत होते .या चक्रात मन स्थिर केले असता ब्रह्मचारिणी देवीची कृपा प्राप्त होते. उत्तरप्रदेशात काशी येथे गंगा किनारी बालाजी घाट वर स्थित देवी माता ब्रह्मचारिणीचे मंदिर आहे. जिथे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.
बागोई मातेचे मंदिर मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यातील जंगलात आहे. या मंदिरात बागोई मातेची ब्रह्मचारिणीच्या रूपात पूजा केली जाते.तसेच लखनौ मध्ये असणाऱ्या देवी बाघंबरी मंदिरामध्येही ब्रह्मचारिणी देवीचे दर्शन घेता येते.
देवी ब्रह्मचारिणीची आराधना करत असताना खालील श्लोकाद्वारे तिची स्तुती केली जाते.
दधाना करपद्माभ्यामक्षमालाकमण्डलू ।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ॥