पुणे : सेवा भवन’ प्रकल्पात डॉ. भा. र. साबडे यांच्या नावाने स्थापन करण्यात आलेल्या प्रशिक्षण दालनामुळे डॉ. साबडे यांचे ज्ञान, त्यांचे कर्तृत्व आणि सेवावृत्ती यांची माहिती सदैव नव्या पिढीपुढे राहील, असा विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सेवा भवन प्रकल्पातील स्व. डॉ. भा. र. साबडे प्रशिक्षण दालनाचे उद्घाटन वंजारवाडकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते. समितीचे कार्यवाह प्रमोद गोर्हे आणि सुनंदा साबडे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. साबडे कुटुंबीयांनी दिलेल्या देणगीतून हे केंद्र साकारले आहे. उद्योजक अरुण कुदळे, डॉ. ए. पी. कुलकर्णी, ‘ग्राहक पेठ’चे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक, ज्येष्ठ साहित्यिक आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉ. अशोक कामत आणि सविता कानडे यांनी डॉ. साबडे यांच्या कार्यकर्तृत्वाला यावेळी उजाळा दिला.
डॉ. साबडे ‘मराठा चेंबर’चे जसे आधारस्तंभ होते, तसेच ते ग्राहक चळवळीतील दीपस्तंभ होते. मराठा चेंबर आणि ग्राहक पेठ या दोन संस्थांची भारतभर किर्ती आहे. या दोन्ही संस्थांमधील त्यांचे कर्तृत्व आणि योगदान असाधारण असेच राहिले, असे वंजारवाडकर यांनी सांगितले. डॉ. आ. रा. भट यांनी लावलेल्या मराठा चेंबरच्या रोपट्याचे रूपांतर डॉ. साबडे यांनी वृक्षामध्ये केले. उद्योजकांना आवश्यक ती सर्व मदत आणि मार्गदर्शन करण्यात, त्यांना प्रेरणा देण्यात ते सदैव पुढे असत, असे कुदळे म्हणाले.
अभ्यासू, संशोधक आणि कार्यकर्ता अशी डॉ. साबडे यांची ओळख होती. लघुउद्योग उभे राहण्यासाठी, उद्योगांना आणि उद्योजकांना चालना देण्यासाठी त्यांनी अविरत कार्य केले, असे डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. ‘ग्राहक पेठ’साठी डॉ. साबडे यांनी पस्तीस वर्षे योगदान दिले. या कारकिर्दीत त्यांनी जी तत्व घालून दिली, त्यानुसार काम केल्यामुळे ग्राहक पेठेचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात झाले. देशाला आदर्श ठरलेले ग्राहक भांडार उभे राहिले. त्यांचे ग्राहक चळवळीतील योगदान असाधारण असेच आहे, असे पाठक म्हणाले.
पुण्याभोवती जी उद्योगनगरी उभी राहिली आहे, त्यात डॉ. साबडे यांचे निश्चितपणे मोठे योगदान होते, असे डॉ. कामत यांनी सांगितले. सेवा भवन प्रकल्पाचे कार्यवाह पलाश देवळणकर यांनी सूत्रसंचालन आणि सहकार्यवाह उमाताई जोशी यांनी प्रास्ताविक केले. सनत कुलकर्णी याने पसायदान सादर केले.