Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर 15-16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय मंत्री पाकिस्तानला भेट देणार आहेत. जयशंकर (S. Jaishankar) SCO (Shanghai Cooperation Organisation) च्या कौन्सिल ऑफ हेड्स ऑफ गव्हर्नमेंट (CHG) च्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पाकिस्तानला जात आहेत. इस्लामाबादमध्ये १५-१६ ऑक्टोबरला ही बैठक होणार आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल (Ranhir Jaiswal) यांनी यासंबधीत आज (शुक्रवारी) ही माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल म्हणाले, “पाकिस्तानने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २९ ऑगस्ट रोजी बैठकीचे निमंत्रण दिले होते. पाकिस्तानच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या मुमताज जहरा बलोच यांनी सांगितले की, ‘सर्व सदस्य देशांच्या प्रमुखांना या बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.” यानंतर परराष्ट्रमंत्र्यांचा दौरा निश्चित करण्यात आला आहे.
2015 मध्ये पंतप्रधान मोदी शेवटच्या वेळी पाकिस्तानला गेले होते. पंतप्रधानांची ही अचानक भेट होती. त्यांनी लाहोरमध्ये तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ यांची भेट घेतली होती. त्याआधी 2015 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानला भेट दिली होती. त्याच वेळी, 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून दोन्ही देशांमध्ये एकही उच्चस्तरीय बैठक झालेली नाही.
SCO ही मध्य आशियातील सर्व देशांमधील शांतता आणि सहकार्य राखण्यासाठी तयार केलेली एक संघटना आहे. पाकिस्तान, चीन, रशिया, भारत, कझाकिस्तान, ताजिकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिस्तान हे देखील या संघटनेचे सदस्य आहेत.
भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये SCO मध्ये सामील झाले. इराणने 2023 मध्ये सदस्यत्व स्वीकारले. सध्या, जगातील सुमारे 40 टक्के लोकसंख्या SCO देशांमध्ये राहते. SCO देशांचा जगाच्या GDP मध्ये 20 टक्के वाटा आहे.