आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये (ISSF Junior World Championship) भारताला सुवर्ण पदक मिळालेले आहे. मुकेश नेलावल्ली, राजवर्धन पाटील आणि हरसिमार सिंग रट्टा यांनी हे पदक जिंकून भारताच्या शिरपेचात मानाचा तूरा रोवला आहे. या त्रिकूटाने ज्युनियर पुरुषांच्या 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल (RFP) वेगात जिंकून 11वे सुवर्णपदक मिळवलेले आहे. त्यांच्या या कामगिरीचे देशभरातून कौतुक होत आहे.
भारताने आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन (ISSF) ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये 16 पदके जिंकलेली आहेत. यामध्ये एक रौप्य आणि चार कास्य पदकांचा समावेश आहे. यामुळे भारत या स्पर्धेत अव्वल स्थानावर असून दुसऱ्या स्थानावर चीन हा देश आहे. चीनने तीन सुवर्ण आणि एक रौप्य पदक जिंकलेले आहेत.
खेळाडू मुकेश नेलावल्ली याने मिळविलेले हे चौथे सुवर्ण पदक आहे. मुकेश नेलावल्ली, राजवर्धन पाटील हे दोघे रैपिड-फायर पिस्टल (RFP) मध्ये वैयक्तिक स्पर्धेत फायनलमध्ये पोहचलेले आहेत. 25 मीटर रॅपिड फायर पिस्तूल प्रकारात पहिल्या सहा शॉट्समध्ये 17 हिट्ससह चौथ्या स्थानावर राजवर्धन पाटील होता. तर मुकेश नेलावल्ली पाचव्या स्थानावर होता. 50 मीटर रायफल प्रोनमध्ये ज्युनियर पुरुषांच्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंमध्ये सिंग ब्रार हा 60 शॉट्समध्ये 623.0 गुणांसह सर्वोत्कृष्ट भारतीय फिनिशर बनला आहे. या स्पर्धेत शिवेंद्र बहादूर सिंग (618.4) 14व्या तर वेदांत नितीन वाघमारे (613.2) 24व्या स्थानावर आहेत.
दरम्यान, भारताला सुवर्णपदक मिळवून देवून मुकेश नेलावल्ली, राजवर्धन पाटील आणि हरसिमार सिंग रट्टा यांनी सर्व भारतीयांची मन जिंकलेली आहेत. देशभरातून त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांची मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली जात आहे. तसेच या पुढील आयुष्यात या खेळाडूंना असेच यश मिळत राहो अशा प्रतिक्रिया लोकांकडून येत आहेत.