नोबेल शांतता पुरस्कार 2024 साठी(Nobel Prize 2024 )संभाव्य उमेदवारांची चर्चा सुरू आहे, आणि यामध्ये युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की (Volodymyr Zelenskyy) यांचे नाव समोर येत आहे. जागतिक शांतता आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी झेलेन्स्की यांनी केलेले प्रयत्न, तसेच रशियासोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, त्यांना या पुरस्कारासाठी सक्षम ठरवले जात असल्याच्या चर्चा रंगत आहेत.
तज्ज्ञांच्या मते, यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार आंतरराष्ट्रीय न्यायालय, पॅलेस्टिनी निर्वासित एजन्सी (यूएनआरडब्लूए), आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांच्यापैकी कोणालाही दिला जाऊ शकतो. तसेच सट्टाबाजारामध्ये अॅलेक्सी नवालनी या रशियाच्या दिवंगत बंडखोर नेत्याचे नाव सर्वाधिक चर्चेत आहे. नवालनी यांचा फेब्रुवारी महिन्यात तुरुंगात संशयास्पद मृत्यू झाला, आणि त्यामुळे त्यांना पुरस्कार मिळण्याची शक्यता कमी झाली आहे.
नोबेल पारितोषिक ही जागतिक स्तरावरील मान्यता प्राप्त पुरस्कार आहे. विविध क्षेत्रातील व्यक्ती आणि संस्था यांना नोबेल पारितोषिक दिले जाते. हा पुरस्कार एकाच श्रेणीतील जास्तीत जास्त तीन लोकांना एकत्रितपणे दिला जातो, परंतु शांतता पुरस्काराच्या बाबतीत तो कोणत्याही संस्थेला देखील दिला जाऊ शकतो. नोबेल पुरस्कार मृत्यूनंतर देण्यात येत नाही, आणि एकदा दिलेला पुरस्कार परत घेता येत नाही हे या पुरस्काराचे वैशिष्ठ आहे. यावर्षी पुरस्काराची रक्कम 11 दशलक्ष स्वीडिश क्रोनर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये 8 कोटींपेक्षा जास्त आहे. हे पारितोषिक विजेत्याला प्रमाणपत्र, सुवर्णपदक आणि परितोषिकाची रक्कम दिली जाते.
दरम्यान, झेलेन्स्की यांचे नेतृत्व आणि त्यांच्या प्रयत्नांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव केला जात आहे, परंतु पुरस्काराच्या दृष्टीने त्यांच्या रशियासोबतच्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर काही अडचणी निर्माण होऊ शकतात. नोबेल समितीने अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे आता नोबेल शांतता पुरस्कार 2024 कोणाला दिला जाणार ? याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे.