भारतीय हॉकीचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी, हॉकी इंडियाची फ्रँचायझी लीग (एचआयएल) (Hockey India League) 7 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुरू करण्यात येत आहे. डिसेंबर 2024 पासून ही लीग चालू करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये आता महिला लीग देखील पहिल्यांदाच आयोजित केली जाणार आहे. ही अतिशय बहुचर्चित लीग असून तब्बल सात वर्षांनी पुन्हा घेण्यात येत आहे. हॉकी इंडियाच्यावतीने आता त्याचे संघ आणि तारखाही जाहीर करण्यात आल्या आहेत. यामुळेच आता खेळाडूंमध्ये आनंददायी वातावरण निर्माण झाले आहे. 4 ऑक्टोबर रोजी नवी दिल्ली येथे हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की यांच्याकडून अधिकृतपणे नवीन हॉकी इंडिया लीगची घोषणा करण्यात आली.
तब्बल 7 वर्षांनी या लीगचे आयोजन करण्यात आले असून या आधी ही लीग २०१३ ते २०१७ दरम्यान पार पडली आहे. यामध्ये जगभरातील अनेक प्रसिद्ध हॉकीपटूंचा समावेश केला गेला होता. परंतू त्यावेळी फक्त पुरुषांच्या लीगचे आयोजन करण्यात आले होते. आता यावर्षी आयोजित केलेल्या लीगमध्ये पुरुष आणि महिला असे दोन्ही संघासाठी लीगचे आयोजन करण्यात आले आहे.
यावेळी 28 डिसेंबरला लीग सुरू होणार असल्याचे सांगितलेले आहे. तसेच अंतिम सामना 5 फेब्रुवारीला होणार आहे. 26 जानेवारी 2025 रोजी महिला स्पर्धेचा अंतिम सामना घेण्यात येणार आहे. राउरकेला आणि रांची येथे पुरुषांच्या लीगचे सर्व सामने खेळवले जाणार आहेत तर महिलांची लीग स्पर्धा रांची, छत्तीसगड येथे खेळविली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या लीगसाठी ऑगस्टमध्ये खेळाडूंची नोंदणी करण्यात आली आहे. जगभरातून अनेक खेळाडूंनी यासाठी आपली नावे नोंदीवलेली आहेत. 13, 14 आणि 15 ऑक्टोबर रोजी हे सर्व खेळाडू लिलाव प्रक्रियेतून जाणार आहेत.या स्पर्धेत पुरुष गटातून आठ तर महिला गटातून सहा संघ सहभागी होणार आहे.
या स्पर्धेत १० फ्रँचायझी असणार असून प्रत्येक फ्रँचायझीकडे २० खेळाडूंचा संघ असणार आहे. पुरुष संघांच्या फ्रँचायझी चेन्नई चार्ल्स ग्रुप,पश्चिम बंगाल – श्राची स्पोर्ट्स, दिल्ली- एसजी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट, ओडिशा – वेदांत लिमिटेड, हैदराबाद – रिझोल्युट स्पोर्ट्स, रांची नवोयम स्पोर्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड, लखनी- यदु स्पोर्ट्स, पंजाब- जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स या आहेत.
दरम्यान, महिला संघांच्या फ्रँचायझी ओडिशा नवोयम स्पोर्ट्स व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड , हरियाणा – जेएसडब्ल्यू स्पोर्ट्स, पश्चिम बंगाल – श्राची स्पोर्ट्स, दिल्ली – एसजी स्पोर्ट्स अँड एंटरटेनमेंट, या आहेत अशी माहिती मिळालेली आहे.