आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आल्या असताना सर्व पक्ष निवडणुकीची जोरदार तयारी करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. ठाणे शहरात (Thane ) आज (५ ऑक्टोबरला ) पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या भव्यदिव्य सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुंबईमध्ये ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात येणार आहे. पंतप्रधानांसोबत या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहनिर्माण, शहरी व्यवहार आणि ऊर्जा मंत्री मनोहर लाल खट्टर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.
‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ हा मेट्रो प्रकल्प 14,120 कोटींचा आहे अशी माहिती मिळाली आहे. मुंबईतील शहरी वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे असे म्हटले जात आहे. या प्रकल्पाची एकूण लांबी २९ किमी आहे. त्यात २० उन्नत आणि २ भूमिगत स्थानके आहेत. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि. (एमएमआरसीएल) या कंपनीकडून हा प्रकल्प उभारला गेला आहे. यातील पहिला टप्पा जोगेश्वरी विक्रोळी लिंड रोडवरील सीप्झ परिसरातील ‘आरे जेव्हीएलआर’ ते ‘वांद्रे-कुर्ला संकुल’मार्गे विमानतळ, असा आहे. ज्याची १२.६९ किमी लांबी असणार आहे. ही मार्गिका जमिनीखाली सरासरी २१ मीटरवरून धावणारी असणार आहे.
दरम्यान, ‘आरे जेव्हीएलआर ते बीकेसी’ या मेट्रो ३ च्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी ते सांताक्रूझ मेट्रो स्थानकापर्यंत मेट्रोने प्रवास करणार असल्याचे म्हटले जात आहे. या प्रवासादरम्यान पंतप्रधान मेट्रोमध्ये ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे लाभार्थी आणि विद्यार्थी, मजूर यांच्याशी संवाद साधणार असल्याचे सांगितले जात आहे.