आगामी विधानसभा निवडणुका (Vidhansabha Elections 2024 ) तोंडावर आल्या असताना राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी वाशीमला पोहरादेवी दर्शनासाठी पोहचले असून त्यांनी या ठिकाणी जनतेशी संवाद साधला आहे.तसेच त्यांनी यावेळी विविध विकासकामांचे लोकार्पणही केलेले आहे. या कार्यक्रमात बोलताना काँग्रेसने बंजारा समाजाचा कायम अपमान केला. त्यांना समान वागणूक दिली नाही, अशी जोरदार टीका पंतप्रधानांनी केलेली आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेले आहेत की, भारताच्या निर्मितीत बंजारा संस्कृतीने फार महत्वाची भूमिका बजावलेली आहे. बंजारा समाजातील कित्येक साधुसंत, महंतांनी राष्ट्रभक्ती आणि धर्मासाठी नवी चेतना दिलेली आहे. पण तरीदेखील स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांनी या संपूर्ण समाजाला अपराधी घोषित केले होते. त्यावेळच्या कॉँग्रेस सरकारची बंजारा समाजाला सन्मान देण्याची जबाबदारी होती. परंतु असे न होता कॉँग्रेस सरकारकडून उलट या समाजाला मुख्य धारेपासून वेगळे करण्यात आले. तसेच बंजारा समाजाप्रती आपली अपमानजनक वागणूक कायम ठेवली अशी जोरदार टीका पंतप्रधानांनी यावेळी बोलताना कॉँग्रेसवर केलेली आहे.
अलीकडेच दिल्लीमध्ये कोट्यावधी रुपयांचे ड्रग्स पकडण्यात आलेले. यामध्ये खरा सूत्रधार हा कॉँग्रेसचाच नेता निघाला. काँग्रेस युवकांना नशेच्या आहारी लावून त्या पैशातून निवडणूक लढवण्याचे प्रयत्न करत आहे. शेतकऱ्यांची देखील कॉँग्रेसने मोठ्या प्रमाणात लूट केलेली आहे असा हल्लाबोल देखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील डबल इंजिनचे सरकार आपल्या शेतकऱ्यांना डबल फायदा मिळवून देत आहे. तसेच लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना निधी देवून नारी शक्तीचा सन्मान वाढविण्याचे सौभाग्य पोहरादेवीच्या कृपाशीर्वादानेच मला मिळाले आहे असे भाष्य देखील पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केले आहे.