S. Jaishankar : परराष्ट्र मंत्री एस जयशंकर (S. Jaishankar) 15-16 ऑक्टोबर रोजी पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहेत. 9 वर्षात पहिल्यांदाच भारतीय मंत्री पाकिस्तानला भेट देणार आहेत. दोन्ही देशांदरम्यानच्या तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दरम्यान, या दौऱ्यात ते पाकिस्तानच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार का याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.
मात्र, आपण तेथे बहुपक्षीय परिषदेसाठी जात आहोत, द्विपक्षीय चर्चेसाठी नाही, असे जयशंकर यांनी स्पष्ट केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे सांगितले.
पाकिस्तान दौऱ्याविषयी बोलताना जयशंकर म्हणाले, “मी तिथे SCO चा एक सदस्य होण्यासाठी जात आहे. या दौऱ्यावेळी भारत-पाकिस्तान संबंधांवर चर्चा कोणतीही चर्चा केली जाणार नाही.
SCO समिट म्हणजे काय?
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) ही एक प्रादेशिक आंतरशासकीय संस्था आहे ज्याची स्थापना सदस्य राष्ट्रांमध्ये विविध क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासाठी केली गेली आहे. SCO ची स्थापना 15 जून 2001 रोजी शांघाय, चीन येथे झाली. चीन, रशिया, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान हे संघटनेचे संस्थापक सदस्य आहेत.
भारत आणि पाकिस्तान 2017 मध्ये SCO मध्ये सामील झाले. इराणने 2023 मध्ये सदस्यत्व स्वीकारले. सध्या, जगातील सुमारे 40 टक्के लोकसंख्या SCO देशांमध्ये राहते. SCO देशांचा जगाच्या GDP मध्ये 20 टक्के वाटा आहे.
SCO चे मुख्य उद्दिष्ट काय आहेत?
सदस्य राष्ट्रांमधील परस्पर विश्वास, मैत्री आणि चांगले-शेजारीपणा मजबूत करणे, राजकारण, व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान आणि तंत्रज्ञान, संस्कृती, शिक्षण, ऊर्जा, अशा विविध क्षेत्रात सदस्य राष्ट्रांमधील प्रभावी सहकार्याला प्रोत्साहन देणे हे SCO चे उद्दिष्ट आहेत.