Kolkata rape-murder case : कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेजमध्ये (R G Kar Medical College and Hospital) घडलेल्या घटनेनंतर ज्युनियर डॉक्टर सातत्याने आंदोलनं करत आहेत. आता पुन्हा एकदा ज्युनियर डॉक्टरांनी ममता (Mamata Banerjee) सरकारविरोधात आंदोलन सुरु केले आहे. आज डॉक्टरांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. पीडितेला न्याय मिळावा या मागणीसाठी डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून संपावर आहेत.
कोलकात्याच्या आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये 9 ऑगस्ट रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर पूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधात ठीक-ठिकाणी आंदोलनं करण्यात आली. तसेच या प्रकरणाने कोलकाता येथील राजकारण चांगलेच तापले, अनेकांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अजूनही कोलकाता येथील वातावरण शांत झालेले नसून, डॉक्टरांनी पुन्हा एकदा सरकराविरोधात आवाज उठवत उपोषण सुरू केले आहे.
शुक्रवारी डॉरिना क्रॉसिंगवर डॉक्टरांनी आंदोलन सुरू केले असून ममता सरकारला 24 तासांचा अल्टिमेटम दिला. या 24 तासात त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ते बेमुदत उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी यावेळी ममता सरकारला दिला.
यापूर्वी 42 दिवस आंदोलन केल्यानंतर 21 सप्टेंबरला सरकारशी चर्चेनंतर डॉक्टरांनी आंदोलन मागे घेतले होते. दरम्यान, राज्य सरकार आपली अंतिम मुदत पूर्ण करण्यात अपयशी ठरत आहे, त्यामुळे आम्ही बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
ज्युनियर डॉक्टरांनी हॉस्पिटलमध्ये सुरक्षेचे चांगले उपाय योजण्याची नितांत गरज असल्यावर भर देत सरकारसमोर 9 मागण्या मांडल्या आहेत. डॉक्टरांच्या मागण्या पुढीलप्रमाणे :-
-प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या घटनेत तात्काळ न्याय मिळावा.
-न्यायालयीन प्रक्रियेला गती द्यावी
-आरोग्य सचिव एनएस निगम यांची हकालपट्टी करावी.
-राज्यातील सर्व रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये केंद्रीकृत रेफरल सिस्टीम सुरू करावी.
-रिकाम्या जागांवर देखरेख ठेवण्यासाठी यंत्रणा सुरू करावी.
-सुरक्षित कामाचे वातावरण सुनिश्चित करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे.
-ऑन-कॉल रूम आणि वॉशरूमसह आवश्यक सुविधांच्या स्थापनेवर देखरेख करण्यासाठी एक टास्क फोर्स तयार करावी.
-उत्तम सुरक्षेसाठी कायमस्वरूपी महिला पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करावी.
-पश्चिम बंगाल वैद्यकीय परिषद आणि पश्चिम बंगाल आरोग्य भरती मंडळातील भ्रष्टाचाराची चौकशी तसेच सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी परिषद निवडणुका घेण्याची मागणी केली आहे.