Sachin Tendulkar : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यांनतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने (Sachin Tendulkar) सोशल मीडियावर एक लक्ष्यवेधी पोस्ट शेअर केली आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे मराठी भाषेला मिळालेला हा सन्मान असल्याचे सचिनने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.
३ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या कॅबिनेट बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. प्रधानमंत्री मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत मराठी सोबतच पाली, प्राकृत, असामी आणि बंगाली या भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा देण्यात आला.
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रात सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्णाम झाले आहे. तसेच सर्वच स्तरांमधून सरकारच्या या निर्णयाचे कौतुक केले जात आहे. विरोधकांकडून देखील या निर्णयाचे स्वागत केले जात आहेत. अशातच आता भारतीय दिग्गज खेळाडू सचिन तेंडूलकरनेही आपल्या मातृभाषेबद्दल अभिमान व्यक्त केला आहे.
सचिनने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट X वर पोस्ट शेअर करत लिहले, “मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी मनाला अभिमान वाटतो. हा सन्मान आपल्या संस्कृतीच्या योगदानाला दिलेली ओळख आहे. बरोबरच असमिया, बंगाली, पाली, आणि प्राकृत या भाषांनाही हा सन्मान मिळाल्याबद्दल अभिनंदन! जास्तीत जास्त लोकांना या सुंदर भाषांचे सौंदर्य अनुभवता येईल!”
तुमच्या माहितीसाठी आजवर फक्त तामिळ, संस्कृत, तेलगू, कन्नड, मल्याळम आणि ओडिया या पाच भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा दिला गेला होता. या दर्जामुळे केंद्र सरकारकडून भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव अनुदान मिळते. भाषेची प्रतिष्ठा वाढते, भाषेच्या श्रेष्ठतवर राजमान्यतेची मोहर उमटते. तसेच भाषेच्या विकास कार्यास चालना मिळते. दरम्यान, ३ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या या निर्णयानंतर एकूण दहा भाषांना ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळाला आहे.