Mumbai : शिवस्मारक समुद्रात झाले पाहिजे, ही शिवभक्तांची इच्छा आहे. केवळ या स्मारकाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन स्थगिती आणणारे कोण आहेत. ते कोणाचे वकील आहे, हे छत्रपती संभाजी राजेंनी (Sambhaji Raje) बघितले पाहिजे. काँग्रेसचा अधिकृत प्रचार करणारे वकील कोर्टात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होऊ नये, म्हणून स्थगिती आणत आहेत. त्याचाही निषेध संभाजी राजांनी केला पाहिजे. असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) खामगावात भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यक्रमात आले असता बोलत होते.
अरबी समुद्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काम अद्यापही सुरु न झाल्याने स्वराज्य पक्षाचे नेते, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आक्रमक झाले आहेत. स्मारकाला विलंब होत असल्याच्या निषेधार्थ संभाजीराजे छत्रपती आज समुद्रात जलपूजन केलेल्या ठिकाणी स्मारकाचा शोध घेण्यासाठी गेले होते. त्यावरच फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2016 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन पार पडले होते. मात्र, त्यानंतर अद्यापही स्मारकाचे काम झालेले नाही. त्यामुळे आक्रमक झालेले संभाजीराजे यांच्या नेतृत्वात समुद्रातील शिवस्मारकाचा शोध घेण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी मात्र, पोलिसांकडून संभाजीराजेंना रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करत फडणवीस म्हणाले, आम्ही कोर्टात भांडत आहोत. आम्ही ते स्मारक लवकरच कोर्टाकडून मंजूर करुन घेऊ.’