बिहारचे (Bihar) माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना आणि त्यांच्यासोबत 9 जणांना ‘लँड फॉर जॉब’(Land For Job)घोटाळा प्रकरणी दिलासा मिळालेला आहे. या प्रकरणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केलेला आहे. प्रत्येकी एक लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर लालू प्रसाद यादव आणि इतर 9 जणांना जामीन दिला असल्याची माहिती मिळालेली आहे. याप्रकरणी कोर्टात आज सुनावणी झाली असून या प्रकरणातील पुढील निर्णय 25 ऑक्टोबरला देण्यात येणार आहे.
लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना त्यांच्या पदाचा वापर करून जमिनीच्या बदल्यात रेल्वेमध्ये नोकरी मिळवून दिल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. नोकरीच्या बदल्यात मोठ्या प्रमाणात यादव कुटुंबियांकडे जमीन हस्तांतरित करण्यात आली असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. या प्रकरणीच आज दिल्लीतील राऊस ॲव्हेन्यू कोर्टात लालू प्रसाद यादव यांचे कुटुंबीय हजर झाले होते.
यावेळी कोर्टात सुनावणीसाठी आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव, विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, तेज प्रताप आणि मिसा भारती हे देखील उपस्थित होते. सुनावणी दरम्यान लालू प्रसाद यादव यांच्या मुलाला म्हणजेच तेज प्रताप यादव यांना न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आलेले आहे. तसेच या प्रकरणातील सर्व आरोपींना न्यायालयाने त्यांचे पासपोर्ट देखील जमा करण्यास सांगितलेले आहेत.
दरम्यान, ‘लँड फॉर जॉब’ या प्रकरणी ईडीने 6 ऑगस्ट रोजी 11 आरोपींविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते.18 दिवसांपूर्वी न्यायालयाने ईडीचे पुरवणी आरोपपत्र स्वीकारुन अखिलेश्वर सिंह आणि त्यांची पत्नी किरण देवी यांच्यासह लालू कुटुंबीयांना समन्स पाठवले होते.आता या प्रकरणी 25 ऑक्टोबरला काय सुनावणी होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.