Maldives President Muizzu : मालदीव (Maldives) आणि भारत यांच्यातील संबंध गेल्या काही दिवसांपासून तणावातून जात आहेत. मात्र, आता दोन्ही देशांमधील नाराजगी दूर करण्यासाठी स्वतः मालदीवने पुढाकार घेतला आहे. मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू (Mohamed Muizzu) सध्या भारत दौऱ्यावर आहेत. आणि येथे ते दोन्ही देशांतील संबंध पुन्हा चांगले कसे होतील यावर लक्ष देत आहेत.
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी नुकतीच भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर यांची भेट घेतली आहे. तसेच पंतप्रधान मोदींचीही भेट घेतली आहे. या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद संपण्याचा प्रयत्न झाला. मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू यांनी भारतात येताच त्यांचा देश भारताची सुरक्षा कमकुवत करण्यासाठी काहीही करणार नाही आणि संरक्षणासह अनेक क्षेत्रांमध्ये मालदीव नेहमीच भारताचे सहकार्य करेल असे म्हंटले आहे.
मोहम्मद मुइज्जू यांचे हे वक्तव्य महत्वाचे मानले जात आहे, कारण मालदीवला चीनचे समर्थक मानले जातात. खरं तर मुइज्जू यांनी आपल्या निवडणूक प्रचारात ‘इंडिया आऊट’वर खूप भर दिला होता. त्यानंतर मालदीव आणि भारताचे संबंध खराब झाले होते. या सर्व चर्चांमध्ये मुइज्जू यांचा भारत दौरा महत्वाचा मानला जात आहे.
मालदीव सध्या मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मालदीववर प्रचंड कर्ज आहे. अशा परिस्थितीत मालदीवला आपल्या शेजारी देश भारताकडून खूप अपेक्षा आहेत, अशा परिस्थितीत त्यांची भारत भेट अधिक महत्त्वाची ठरते. कारण भारताने यापूर्वीही मालदीवला मदत केली आहे, त्यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या मालदीवलाही भारताकडून आर्थिक मदतीची अपेक्षा आहे.
भारतासोबतच्या संबंधांवर मालदीवचे राष्ट्रपती काय म्हणाले?
मालदीवचे अध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांनी इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले की, मालदीवचे भारतासोबतचे संबंध आदर आणि समान हितसंबंधांवर आधारित आहेत आणि दिल्ली त्यांच्या देशाच्या सर्वात मोठ्या व्यापार आणि विकास भागीदारांपैकी एक आहे. ते म्हणाले, “मालदीव भारताची सुरक्षा कमकुवत करण्यासाठी कधीही काहीही करणार नाही.
आम्ही इतर देशांसोबत विविध क्षेत्रात सहकार्य वाढवत असताना, आमच्या कृतींमुळे आमच्या क्षेत्राच्या सुरक्षिततेशी आणि स्थैर्याशी तडजोड होणार नाही याची खात्री करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
भारतीय पर्यटकांनीही केले आवाहन
शेजारी आणि मित्रांचा आदर आपल्या डीएनएमध्ये आहे. यासोबतच त्यांनी भारतीय पर्यटकांना मालदीवला भेट देण्याचे आवाहनही केले आहे. खरं तर, मालदीवच्या अनेक नेत्यांनी पीएम मोदींवर टिप्पणी केली होती, त्यानंतर भारतीय पर्यटकांनी मालदीवर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे मालदीवचे मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान, मालदीवच्या परराष्ट्र मंत्रालयाने या टिप्पण्यांपासून स्वतःला दूर केले आणि मंत्र्यांना निलंबित करण्यात आले. त्यानंतर, मे महिन्यात मालदीवमधून भारतीय लष्करी जवानांना बाहेर काढण्यात आले. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच चकित केले. मात्र, आता मुइज्जू यांच्या भारत दौऱ्यांनंतर दोन्ही देशांमधील दरी कमी होऊन पुन्हा स्थिती पूर्वस्तरावर येत असल्याची चिन्हे दिसत आहेत.