देशातील प्रसिद्ध उद्योगपती व टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समोर आले होते. रतन टाटा यांची प्रकृती ठीक नसून त्यांना रक्तदाबाचा त्रास होत आहे अशा चर्चा सगळीकडे सुरू आहेत. अनेकांनी त्यांच्या प्रकृतिविषयी चिंता देखील व्यक्त केली आहे. यामुळे देशभरातील लोकांकडून अनेक तर्क-वितर्क काढले जात होते.
मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital Trust) रात्री उशिरा 12.30 ते 1 च्या दरम्यान रतन टाटा (Ratan Tata)यांना दाखल करण्यात आले असून तज्ज्ञ डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहेत अशी माहिती समोर आली होती. हृदयरोग तज्ज्ञ डॉ. शाहरुख असपी गोळवाला यांच्या मार्गदर्शनाखाली रतन टाटांवर उपचार सुरू आहेत असे सांगण्यात आले होते. परंतु आता रतन टाटा यांनी स्वत: आपल्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट करून आपल्या प्रकृती विषयी माहिती दिलेली आहे.
एक्स अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये रतन टाटा म्हणाले आहेत की, “माझ्या प्रकृतीविषयी अफवा पसरली जात असून त्यावरून सुरू असलेल्या चर्चेची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे. परंतु चिंतेचे काहीच कारण नाही. माझे वय आणि संबंधित वैद्यकीय परिस्थितीमुळे मी सध्या वैद्यकीय तपासणी करत आहे.काळजी करण्यासारखे मला काहीही झालेले नाही. त्यामुळे कृपया लोकांनी आणि मीडियाने कुठल्याही प्रकारची चुकीची महिती पसरवणे टाळावे’,असे रतन टाटा यांनी पोस्टच्या माध्यमातून म्हटलेले आहे.
दरम्यान, सध्या रतन टाटा उद्योगांसह सामाजिक क्षेत्रातही काम करत आहेत. उद्योगासोबतच रतन टाटा हे त्यांच्या परोपकारी कार्यासाठीही जगभर प्रसिद्ध आहेत. रतन टाटा यांनी भारतीय विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी कॉर्नेल विद्यापीठाला एकूण २८ दशलक्ष डॉलर्स दान केलेले आहेत. तसेच त्यांनी ५० दशलक्ष डॉलर्स हे हार्वर्ड बिझनेस स्कूलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी दान केलेले आहेत. ९५ कोटी रुपयांची देणगी त्यांनी २०१४ मध्ये IIT बॉम्बेमध्ये दिली होती. याचसोबत आपल्या संपत्तीतील दरवर्षीच मोठा हिस्सा रतन टाटा दान करत असतात.