Israel News : इस्रायल (Israel) आणि हिजबुल्लाह (Hezbollah ) यांच्यात सध्या युद्ध सुरू आहे. इस्त्रायली सैन्य गेल्या काही दिवसांपासून लेबनॉनमध्ये असलेल्या हिजबुल्लाह संघनेवर सातत्याने हवाई हल्ले करत आहे. दरम्यान, आता इस्त्रायलने लेबनॉनमध्ये घुसून हिजबुल्लाह विरुद्ध कारवाई सुरु केली आहे. इस्त्रायल करत असेलल्या या हल्ल्यात लेबनॉन पूर्णपणे नष्ट होत चालले आहे.
दरम्यान आता या सर्व परिस्थितीवर लेबनॉनचे भारतातील राजदूत डॉ. रबी नरश यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी भारताची मदत मागितली आहे. भारताने हे युद्ध थांबवण्यासाठी मध्यस्थी करावी असे आवाहन त्यांच्याकडून करण्यात आले आहे.
रबी नरश म्हणाले की, मध्य पूर्व आशियामध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. आमच्याशी आणि इस्रायलशी भारताचे चांगले संबंध आहेत. अशास्थितीत त्यांनी हे युद्ध थांबवण्यासाठी आमची मदत करावी. असे त्यांनी म्हंटले आहे.
ते पुढे म्हणाले, ‘आम्ही नेहमीच युद्धविराम आणि तणाव कमी करण्याचे आवाहन केले आहे. आम्हाला युद्ध नको आहे, आम्ही हे जाहीरपणे देखील सांगितले आहे. पुढे, लेबनॉनमधील भारतीय नागरिक आणि युनिफिल टीमबद्दल ते म्हणाले की, सध्या येथे सुमारे 3000-4000 भारतीय नागरिक राहतात.
दरम्यान, इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यात सुरु असलेल्या संघर्षामध्ये शेकडो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, तर हजारो लोक जखमी झाले आहेत. हवाई हल्ल्यात लेबनॉनमधील आतापर्यंत एकूण 1,640 लोक मारले गेले आहेत. तर हिजबुल्लाह दहशतवाद्यांबद्दल बोलताना इस्रायलचा दावा आहे की, त्यांच्या हवाई हल्ल्यात हिजबुल्लाह प्रमुख हसन नसराल्लाह आणि दोन मुख्य सहकारी यांच्यासह अनेक हिजबुल्ला दहशतवादी मारले गेले आहेत.