नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे. पंचमी किंवा मातृत्व आणि मुलांची देवी म्हणूनही ओळखली जाणारी, देवी स्कंदमातेची नवरात्रीच्या पाचव्या दिवशी तिच्या भक्तांद्वारे पूजा केली जाते. दुर्गा देवीचे हे स्कंदमाता रूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. .तिला चार हात आहेत त्यापैकी दोन हातांनी कमळ धारण केले आहे आणि इतर दोन हातांमध्ये पवित्र कमंडलू आणि घंटा आहे. तिला तीन डोळे आणि चमकदार रंग आहे. देवीने भगवान कार्तिकेय किंवा स्कंद आपल्या मांडीवर घेतले आहे म्हणूनही तिला स्कंदमाता संबोधले जाते.
स्कंदमाता बाल कार्तिकेयासह सिंहावर आरूढ असे तिचे रूप आहे. हे शौर्य आणि करुणेचे द्योतक आहे.तसेच स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे. स्कंदमाता चतुर्भुज असून तिच्या दोन्ही हातात कमळाचे फुल आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे.या देवीने देवांचा शत्रू तारकासुराचा वध केला होता अशी कथा सांगितली जाते
या दिवशी साधकाचे मन ‘विशुद्ध’ चक्रात स्थिर झालेले असते. मध्यप्रदेशातील विदिशा इथे या स्कंदमाता रूपातील देवीचे मंदिर देवीच्या नऊ रूपांपैकी पाचवे रूप विराजमान झालेले बघायला मिळते. तसेच वाराणसीच्या जगतपुरा भागातील बागेश्वरी देवी मंदिर परिसरात स्कंदमातेचे मंदिर आहे. काशीखंड आणि देवी पुराणात देवीच्या या रूपाचा उल्लेख आहे.