पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या(Narendra Modi) हस्ते शनिवारी मुंबईतील(Mumbai ) कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो 3 मार्गिकेतील आरे ते बीकेसी या टप्प्याचा लोकार्पण सोहळा पार पडला आहे. १२.६९ किमी लांबीचा हा मार्ग आहे. प्रवाशांच्या वेळेची बचत व्हावी म्हणून ही मार्गिका सुरू करण्यात आली आहे. तसेच या मार्गिकेमुळे वाहतूक कोंडीची समस्या देखील दूर होण्यास मदत होणार आहे. आज सकाळी 11 वाजता बीकेसी मेट्रो स्थानक आणि आरे जेव्हीएलआर मेट्रो स्थानकावरून पहिली भुयारी मेट्रो गाडी सुटली आहे.
मध्य रेल्वे मार्गावरून येणाऱ्या प्रवाशांना घाटकोपर येथून मेट्रो १ ने प्रवास करून मरोळ नाका येथे जाता येणार आहे. तसेच आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल १ आणि टर्मिनल २ यांनाही जोडणी देण्याचे काम मेट्रोमुळे शक्य होणार आहे. याचसोबत मेट्रो १ मार्गिकेच्या मरोळ नाका स्थानकालाही मेट्रो ३ मार्गिकेची जोडणी देण्यात आलेली आहे. मुंबईकरांना मेट्रोने प्रवास करताना कोणत्याच प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी मुंबई मेट्रों रेल कॉर्पोरेशनने (एमएमआरसीएल) मेट्रो कनेक्ट 3 ॲप देखील बनविलेले आहे. या ॲपच्या माध्यमातून लोकांना सर्व स्थानकांची, तेथील सोयीसुविधांची त्याचसोबत बस, टॅक्सी, रिक्षाचा पर्याय इत्यादी सर्व बाबींची माहिती देखील मिळवता येणार आहे.
दरम्यान, या ठिकाणी क्यू आर कोड स्कॅनिंग तिकीट, ई तिकीट सेवेसह ईव्हीएम मशीनची सुविधा देखील प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आलेली आहे. मेट्रोचा हा प्रवास करताना प्रवाशांच्या काही तक्रारी असतील तर त्या तक्रारी या ॲपच्या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार असल्याची माहिती देखील सांगण्यात आली आहे.