Jammu Kashmir Election Results 2024 : जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) यांची मुलगी आणि श्रीगुफ्वारा-बिजबेहारा मतदारसंघातील पीडीपी उमेदवार इल्तिजा मुफ्ती (Iltija Mufti) यांनी आपला पराभव स्वीकारला आहे. इल्तिजा मुफ्ती यांनी निकाल जाहीर होण्यापूर्वीच पराभव स्वीकारला आहे. याबाबत त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर पोस्ट शेअर केली आहे. पोस्ट शेअर करत आपल्या परिसरातील जनतेचे आभार देखील मानले आहेत.
इल्तिजा मुफ्ती यांनी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहिले, ‘मला लोकांचा निर्णय मान्य आहे. बिजबेहरामधील सर्वांकडून मला मिळालेले प्रेम आणि आपुलकी सदैव माझ्या पाठीशी राहील. तसेच त्यांनी आपल्या पोस्टयामध्ये पीडीपीच्या कार्यकर्त्यांचे देखील आभार मानले आहेत.
I accept the verdict of the people. The love & affection I received from everyone in Bijbehara will always stay with me. Gratitude to my PDP workers who worked so hard throughout this campaign 💚
— Iltija Mufti (@IltijaMufti_) October 8, 2024
इल्तिजा मुफ्ती पहिल्यांदाच निडवणुकीच्या मैदानात
मेहबूबा मुफ्ती यांनी यंदाच्या विधानसभा निवडणुकीद्वारे त्यांची मुलगी इल्तिजा यांना सक्रिय राजकारणात उतरवले आहे. इल्तिजा मुफ्ती यांची ही पहिलीच निवडणूक आहे. निवडणूक आयोगाच्या ताज्या आकडेवारीनुसार, 12 पैकी 10 वी मतदान सुरू आहे. सिरगुफ्वारा-बिजबेहारा जागेवर इल्तिजा मुफ्ती 7004 मतांनी पिछाडीवर आहेत. तर नॅशनल कॉन्फरन्सचे उमेदवार बशीर अहमद वीरी २७९२७ मतांनी आघाडीवर आहेत. मतमोजणीच्या आणखी दोन फेऱ्या उरल्या असून कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
तुमच्या माहितीसाठी बिजबेहरा ही जागा गेल्या 25 वर्षांपासून मुफ्ती कुटुंबाचा बालेकिल्ला आहे. येथून विजयी झाल्यानंतर मुफ्ती मोहम्मद सईद आणि त्यांची कन्या मेहबूबा मुफ्ती जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री बनले आहेत. मात्र या जागेवरून आता इल्तिजा मुफ्ती यांना पराभव स्वीकारावा लागत आहे. इल्तिजा मुफ्ती यांचा पराभव जवळ-जवळ निश्चित असल्याचे मानले जात आहे.
विधानसभेच्या 90 जागांसाठी मतमोजणी सुरू
जम्मू-काश्मीरमधील विधानसभेच्या सर्व 90 जागांसाठी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणी सुरू आहे. दुपारी 12.30 वाजता निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार नॅशनल कॉन्फरन्स सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. नॅशनल कॉन्फरन्सची 43 जागांवर आघाडी आहे. भारतीय जनता पक्ष 28 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 8 जागांवर आघाडीवर आहे, तर पीडीपी विधानसभेच्या 2 जागांवर आघाडीवर आहे.