Jammu And Kashmir : जम्मू काश्मीरमध्ये 370 कलमं हे भारतीय जनता पक्षाने स्वतःच्या फायद्यासाठी रद्द केलेले नाही. भारताच्या फायद्यासाठी रद्द केले आहे. एकसंघ भारत निर्माण केलेला आहे. आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीमुळे एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, आमच्या देशामध्ये लोकशाही मजबूत आहे. जगाच्या पाठीवर जगाचे सगळे लोकं, निरिक्षक, वेगवेगळ्या देशाचे प्रतिनिधी आम्ही बोलावले होते आणि सांगितले की, पाकिस्तान जो प्रचार करतो तो कसा खोटा आहे. काश्मीरमध्ये लोकशाही प्रक्रिया नांदते हे आम्ही दाखवून दिले. अशी प्रतिक्रिया भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जम्मू काश्मीर मधल्या परभवानंतर दिली आहे.
मोदी सरकारसकडून 370 कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणूका पार पडल्या. येथे तब्बल दहा वर्षांनंतर विधानसभा निवडणूक झाल्यामुळे भाजपच्या येथून अपेक्षा होत्या. मात्र काश्मीरमधील लोकांनी राष्ट्रीय पक्षांपेक्षा स्थानिक पक्षांना साथ दिली. सुरुवातीपासून काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने आघाडी घेतली होती. आणि अखेर त्यांनी येथे दणदणीत विजय मिळवला. यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सोलापूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
ते पुढे म्हणाले की, “काश्मीरमध्ये निवडणूक देखील घेतली. प्रचंड मतदान देखील झाले. शांतपणे निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली. एक भाजपचा कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की, आम्ही जो निर्णय (कलम 370 रद्द) घेतला आणि त्या निर्णयानंतर जे लोक म्हणत होते की रक्ताचे पाट वाहतील. पण असं न होता तिथे लोकशाही दिसून आली. काश्मीरमध्ये लोकनियुक्त सरकार सत्तेवर येणार आहे. आत्तापर्यंतचा भाजपला परफॉर्मन्स सर्वात चांगला आहे,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.