New Delhi : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये (Haryana and Jammu Kashmir Result 2024) झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल समोर आले असून, हरियाणात भारतीय जनता पक्ष सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करत आहे. तर जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स (Jammu & Kashmir National Conference) आघाडीला बहुमत मिळाले आहे. अशातच आता दोन्ही राज्यांमध्ये मुख्यमंत्रिपदी कोण विराजमान होणार याची उत्सुकता वाढली आहे.
हरियाणामध्ये भाजपने स्वबळावर बहुमत गाठत इतिहास घडवला आहे. तर जम्मू काश्मीर मध्ये काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सने मिळून आघाडी घेतली आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर लगेचच हरियाणा आणि जम्मू काश्मीरमधील मुख्यमंत्र्यांचा चेहरा समोर आला आहे.
हरियाणामध्ये नायब सिंह सैनी यांच्या अध्यक्षतेखाली विधानसभा निवडणुका लढवण्यात आल्या, दरम्यान, तेच हरियाणाच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार असल्याचे हरियाणाचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल बदोली यांनी जाहीर केले आहे.
तर जम्मू आणि काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या इंडिया आघाडीने बहुमत मिळवले असून, आघाडीला 90 पैकी जवळपास 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामध्ये जवळपास 42 जागा एकट्या नॅशनल कॉन्फरन्सला मिळू शकतात.
या विजयानंतर एनसीचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला हे पुन्हा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असेही फारुख अब्दुल्ला यांनी जाहीर केले आहे.