आज हरियाणा (Haryana) विधानसभा निवडणुकीचा (Vidhansabha Elections 2024)) निकाल जाहीर होत आहे. आज सकाळपासून विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतमोजणीला सुरुवात देखील झालेली आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना भाजपने (Bharatiya Janata Party) सध्या जोरदार आघाडी घेतली आहे. या निवडणुकीत भाजपाला तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. यामुळेच आता या विजयाचा भाजप मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करताना दिसून येत आहे. भाजप पक्षाच्या दिल्ली कार्यालयात यासाठी जोरदार तयारी सुरु असून हायकमांडकडून देखील तयारी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) खुद्द हा उत्साह साजरा करण्यासाठी पक्ष मुख्यालयात पोहचणार असल्याची माहिती मिळालेली आहे. दिल्लीतील भाजप मुख्यालयात विजयाचा उत्साह साजरा करण्यासाठी 100 किलो जिलेबीची ऑर्डर देण्यात आली आहे. आज सायंकाळी भाजपच्या मुख्यालयात या जिलेब्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, सध्या सोशल मीडियावर हरियाणातील जिलेबीचा ट्रेंड सुरु आहे. सोशल मिडीयावर जिलेबीचे अनेक मिम्स व्हायरल होताना दिसत आहेत. या जिलेबीच्या मिम्सद्वारे काँग्रेसला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. कारण राहुल गांधींना(Rahul Gandhi) निवडणूक प्रचारात कॉंग्रेसचे खासदार दीपेंद्र सिंह हुड्डा (Deepender Singh Hooda) यांनी प्रचारादरम्यान एका रॅलीत प्रसिद्ध ‘मातू राम’च्या जिलेबीचा डब्बा भेट दिला होता. त्यावेळी राहुल गांधींनी या जिलेबीचे अतिशय कौतुक केले होते. यानंतर राहुल गांधी यांना सोशल मीडियावर खूप ट्रोल केले गेले होते.
आज सकाळी हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली. त्यावेळी पहिल्यांदा काँग्रेस पक्ष आघाडीवर होता. परंतु काही कालावधीनंतर मतांचे आकडे बदलून भाजपाकडे सर्वात जास्त जागा मिळाल्या आहेत. यानंतर अनेक जणांनी काँग्रेसची तुलना जिलेबीच्या आकाराशी केली आणि सोशल मीडियावर जिलेबीचा ट्रेंडच सुरु झाला. लोकांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीची तुलना वाकड्या तिकड्या जिलेबीशी केली असल्याचे दिसून येत आहे . आज सकाळी दिल्ली स्थित AICC च्या मुख्यालयात काँग्रेस कार्यक्रत्यांकडून लाडू आणि जिलेबी वाटण्याची तयारी देखील करण्यात आली होती. दरम्यान, आता गोहना जिलेबी फक्त गोड नाही तर हरियाणातील निवडणुकीच्या वातावरणाचा एक महत्त्वाचा भाग बनलेली दिसून येत आहे. सध्या हरियाणामध्ये मतमोजणी सुरु असून आतापर्यंत भाजपला ४९ जागा तर काँग्रेसला ३६ जागा मिळालेल्या आहेत.