AAP’s Election Surprise : हरियाणात झालेल्या विधानसभा निवडणुकीत (Haryana Results 2024) आपच्या हाती मोठी निराशा आली. याठिकाणी पक्षाला एकही जागा जिंकता आली आहे. जवळपास सर्वच उमेदवार पिछाडीवर दिसत आहेत, अशा स्थितीत त्यांना त्यांची अनामत रक्कमही वाचवता आलेली नाही.
दिल्ली आणि पंजाब या शेजारच्या राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षाला हरियाणामध्येही आपली सत्ता स्थापन करायची होती. आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी हरियाणातील निवडणूक प्रचारादरम्यान दावा केला होता की, त्यांच्या पक्षाच्या पाठिंब्याशिवाय कोणताही पक्ष राज्यात सरकार स्थापन करण्यात यशस्वी होणार नाही. पण निवडणूक आयोगाची आकडेवारी काही वेगळंच सांगत आहे. हरियाणात आम आदमी पक्षाला केवळ 1.65 टक्के मते मिळत आहेत.
काँग्रेससोबत युतीची चर्चा अयशस्वी झाल्यानंतर, आप ने हरियाणात 90 पैकी 89 जागा लढवल्या. 2019 च्या हरियाणा निवडणुकीतही AAP ने 46 जागांवर निवडणूक लढवली होती आणि त्यांना सर्वत्र पराभवाला सामोरे जावे लागले होते. आम आदमी पक्षाला NOTA पेक्षाही कमी मतं मिळाली होती. 2014 मध्ये निवडणूकीत पदार्पण केल्यापासून, AAP हरियाणातील कोणत्याही विधानसभा निवडणुकीत किंवा लोकसभा निवडणुकीत आपले खाते उघडण्यात अपयशी ठरली आहे.
दरम्यान, दिल्ली दारू धोरण प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्याने आणि तिहार तुरुंगातून सुटका झाल्यानंतर हरियाणातील आपच्या निवडणूक प्रचाराला मोठी चालना मिळाली. त्यांनी पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व केले आणि आपच्या पाठिंब्याशिवाय हरियाणात पुढील सरकार स्थापन होणार नाही, असा दावा केला. मात्र, निकाल दर्शवतात की आप हरियाणात छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे आणि अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारातही काही फरक पडला नाही.