देशभरात विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Elections 2024) सर्व पक्ष जोरदार तयारी करत आहेत. आज जम्मू काश्मीर आणि हरियाणामध्ये (Haryana) विधानसभा निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया पार पडत आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक तोंडावर आल्या असताना सर्व पक्ष या निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा करताना दिसत आहेत. बारामती मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याकडेच सर्वांचे लक्ष होते. असे असतानाच आता राष्ट्रवादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल(Praful Patel) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे. अजित पवार तब्बल ७ वेळा बारामती मतदार संघातून आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. आता अजित पवारच बारामती विधानसभेतून निवडणूक लढणार यावर जवळ जवळ शिक्कामोर्तब झालेले आहे.
अजित पवारांनी स्वतः बारामतीतून लढण्याची इच्छा नाही असे भाष्य केले होते. त्यामुळे प्रफुल पटेल यांनी अजित पवारांच्या नावाची घोषणा केल्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. परंतु लोकसभा निवडणुकीत त्यांचा सुप्रिया सुळेंकडून पराभव झाला होता. यानंतर या पराभवाची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली होती.
विधानसभा निवडणुकीत अजितदादा बारामतीऐवजी शिरूरमधून निवडणूक लढणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. तसेच अजित पवार यांनी जय पवारांचे नाव आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पुढे केले होते. परंतु प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी या प्रस्तावाला विरोध केला होता. यानंतर या प्रस्तावाला विरोध करत बारामतीतून एक लाख सह्याही गोळा करण्यात आल्या होत्या . बारामतीतील कार्यकर्त्यांनी अजित पवारच उमेदवार हवेत अशी मागणी देखील केली होती.यानंतर मी जो उमेदवार देईन तो बारामतीतून निवडून द्या असे आवाहन देखील अजित पवार यांनी केले होते.
दरम्यान, बारामती मतदारसंघामध्ये लोकसभेची पुनरावृत्ती होत आता विधानसभा निवडणुकीमध्ये पवार विरूध्द पवार अशी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळेच पवार विरुद्ध पवार अशी चुरशीची लढत होणार असून आगामी निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार ? हे पाहणे उत्सुकाचे ठरणार आहे.