जळगांव : जगातील जे जे चांगले आहे, ते भारतीय संविधानात आणण्यासाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केले. संविधान दुरुस्ती आणि संविधान बदल ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. संविधानात दुरुस्ती करता येते परंतू संसदेत बहुमत असले तरी संविधानाचा मूलभूत ढाचा बदलता येत नाही. ४२ वी घटनादुरुस्ती व्यतिरिक्त इतर घटनादुरुस्त्या कालसुसंगत व आवश्यक होत्या. असे मत प्रा.डॉ.संजय गायकवाड यांनी सामाजिक संवाद मेळाव्यात व्यक्त केले.
साईलीला मंगल कार्यालय, जळगाव येथे विवेक विचार मंचच्या वतीने सामाजिक संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर विवेक विचार मंचाचे प्रांत समन्वयक अरुण कराड, जिल्हा संयोजक शुभम ईश्वरे यांची उपस्थिती होती.
या सामाजिक संवाद मेळाव्यात जळगांव जिल्ह्यातील अनुसूचित जाती, जमाती व वंचित घटक, सद्यस्थिती, भारतीय राज्यघटना, सामाजिक न्याय, शासकीय योजना याबाबत चर्चा व मुक्त संवाद. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त केले.
मी प्रथम आणि अंतिमत: भारतीय आहे. असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत असत. हा दृष्टीकोन ठेवुन आपण भारतीय संविधान समजुन घेताना आपण धर्म, जात अशा गोष्टीवरुन आपली ओळख करुन न देता भारतीय अशीच ओळख करुन देणे आवश्यक असल्याचे प्रा.गायकवाड यांनी सांगितले.
संविधानाची प्रास्ताविका वाचुन प्रास्ताविकेप्रमाणे वागणे गरजेचे आहे. मग संविधान बदलणार असा फेक नरेटीव्हवर आपला कधीच विश्वास बसणार नाही. संविधानात आता पर्यंत काळानुरूप अनेक दुरुस्त्या झालेल्या आहे. जसे विधानसभा व लोकसभा निवडणुकीमध्ये महिला आरक्षण देणे, म्हणजे भारतीय सामाजिक क्षेत्रातील क्रांतीकारी बदल आहे. महिला आरक्षणामुळे फक्त महीलांचाच विकास होईल असे नाही तर स्त्रियांमधील विद्वत्ता व कौशल्य समाजाच्या कल्याणासाठी उपयोगात येईल.
अरुण कराड यांनी सर्वांशी संवाद साधला, ते म्हणाले, भारतीय संविधानाने वंचित, पिडीत,शोषीत समाजाला समानतेचा हक्क दिला. संविधानामुळे भारतीय जनसामान्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडला आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी लिहीलेले संविधान भारतीयाचे संरक्षण करण्यासाठी भक्कम व मजबूत आहे. संविधान बदलले जाऊ शकते. हा खोटा नरेटीव्ह आहे. तो पसरवणारे संविधान विरोधी आहेत. जनसामान्यांच्या मनात संविधानविषयी शंका निर्माण करून संविधानाविषयीचा अविश्वास निर्माण करत आहेत ही निश्चितच चांगली गोष्ट नाही.
काँग्रेसने संविधानावर अनेक आघात केलेले आहे. देशावर आणीबाणी लादून हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला, सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देवून सुद्धा शहाबानो ला पोटगी दिली नाही. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा दिल्याने अनुसूचित जाती जमातींना संविधानिक हक्कांपासून वंचित ठेवले गेले, धर्माच्या आधारावर भिन्न व अन्यायी वैयक्तिक कायदे ठेवले. या गोष्टी संविधान विरोधी असून ज्या बाबासाहेबांनी संविधान निर्माण केले त्यांना दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसने पराभूत करून त्यांचा अवमान केला. बाबासाहेबांना “भारतरत्न”दिला नाही. काँग्रेसकडून आजही मुस्लिम मतपेढी साठी संविधानिक तत्वांना हरताळ फासला जातो. इस्लामिक कट्टरतावाद तसेच माओवादी चळवळींकडून संविधानाला धोका असल्याचे मत अरूण कराड यांनी मांडले.
संविधानाचे सरनाम्याचे सामूहिक वाचन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.राहुल सुरडकर यांनी केले. आभार प्रदर्शन श्री. संजय मोरे यांनी केले. या वेळी श्री.अनिल चाबुकस्वार, निखिल घोलप, श्री.प्रा.धनंजय चौधरी , श्री.स्वर्णदीप राजपुत, प्रा.बापु संधानशिव व जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.