Israel war : इस्रायलने हिजबुल्लाहचा नवा प्रमुख हाशेम सफिदीनला देखील ठार केले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू (Benjamin Netanyahu) यांनी मंगळवारी याबात घोषणा केली आहे. यावेळी नेतन्याहू यांनी लेबनॉनच्या (Lebanon) जनतेला देखील इशारा दिला आहे.
हिजबुल्लाहच्या दहशतवाद्यांना आपल्या देशातून हाकलून द्या, अन्यथा मोठी कारवाई केली जाईल असा संदेश दिला आहे. नेतान्याहू म्हणाले, ‘आम्ही हिजबुल्लाची शक्ती नष्ट केली आहे. त्यांचे हजारो दहशतवादी मारले गेले आहेत. आता पुन्हा वर्षानुवर्षे उभे राहणे त्यांच्यासाठी कठीण आहे.
इस्रायलचे पंतप्रधान म्हणाले, ‘ही तुमची निवड आहे. आपण इच्छित असल्यास, आपण एक क्षणात शांत लेबनॉन परत मिळवू शकता. हिजबुल्लाहला देशाबाहेर हाकलून द्या नाही तर ते तुमच्या घरात घुसून तुम्हाला मारतील.’
इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांनी हाशेम सफिदीनच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्लाहला मारल्यानंत सफीउद्दीन दहशतवादी गटावर नियंत्रण ठेवत होता.
दरम्यान, इस्रायली लष्कराचे लेबनॉनवर हवाई हल्ले सुरूच आहेत. इस्रायलने गेल्या 24 तासांत 137 हवाई हल्ले केले आहेत. मुख्यतः दक्षिण लेबनॉन, बेरूत आणि बेका यांना लक्ष्य करण्यात आले आहे. 8 ऑक्टोबर 2023 पासून इस्रायलने सुमारे 10 हजार रॉकेट लेबनॉनवर डागले आहेत. यामुळे दक्षिण लेबनॉनमधून हजारो लोकांनी पलायन केले आहे. तर अनेकांनी बंकरमध्ये आश्रय घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधील 10 लाखांहून अधिक लोक सध्या बेघर आहेत.
इस्रायलने गेल्या महिन्यात लेबनॉनमधील हिजबुल्लाच्या ठिकाणांवर हवाई हल्ले केल्यामुळे, 400,000 हून अधिक लोक सीरिया निघून गेले आहेत. यातील बहुतांश सीरियाचे नागरिक असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री उशिरा इस्रायलने सीरियाची राजधानी दमास्कसवर हल्ला केला आहेत. सीरियन मीडियाने याबद्दल दुजोरा दिला आहे.