Devendra Fadnavis : हरियाणाच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. इंडिया आघाडीने विजयाची तयारी केली होती. केव्हा एकदा निकाल जाहीर होतो आणि भाजपवर हल्ला करतो, याची तयारी शरद पवार (Sharad Pawar), उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी करून ठेवली होती. ते आता तोंडघशी पडले आहेत असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी लगावला आहे.
हरियाणात एकहाती विजय मिळवल्यानंतर फडवीसानी प्रतिक्रिया दिली आहे, ते नागपुरात बोलत होते. फडणवीस म्हणाले, ‘देशाचा मूड बदलला असल्याचे आता त्यांच्याही लक्षात आले आहे. कालपर्यंत ‘हम साथ साथ है‘ म्हणणारे ‘हम तुम्हारे है कौन’ असे म्हणू लागले आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, लोकसभेमध्ये जो फेक नरेटिव्ह तयार करण्यात आला होता आता लोकांच्या लक्षात आलेले आहे आणि तो फेक नरेटिव्ह संपलेला आहे आणि लोक भाजपच्या पाठिशी आहेत. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आज फडणवीस नागपूर दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते अनेक कामांचे भूमिपुजन आणि लोकार्पण करण्यात आले आहे. गेल्या दोन वर्षपासून रखडलेल्या नागपूरच्या विमानतळाला आंतराष्ट्रीय करण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. तसेच नागनदीचे काम सुरू झाले आहे. पोहरा नदीसाठी साडेसातशे कोटी रुपये मंजूर झाले आहे. एकट्या नागपूर शहरात बारा ते तेरा हजार कोटींच्या कामाला सुरुवात होत असल्याचे फडणवीसांनी यावेळी सांगितले आहे.
तसेच, ओबीसी विद्यार्थ्यांना शहरात शिकण्यासाठी हक्काचे स्थान यामुळे मिळणार आहे. ज्या ठिकाणी होस्टेल नाही तिथे विद्यार्थ्यांना भत्तासुद्धा देणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी होस्टेल सुरू करण्याची घोषणा महाविकास आघाडीने केली होती. मात्र अडीच वर्षे सत्तेवर असताना एकही होस्टेल सुरू केले नाही. तर महायुती सरकारच्या प्रयत्नातून आज 52 होस्टेल सुरु होत असल्याचे देखील फडणवीस म्हणाले आहेत.