आज पाथर्डी तालुक्यातील भगवानगडावर आयोजित दसरा मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी जातीय राजकारणावर कठोर शब्दात टीका केली. त्यांनी अप्रत्यक्षपणे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांचा उल्लेख करत, जातीवर स्वार होणाऱ्यांऐवजी काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा सल्ला दिला. गोपीनाथ मुंडेंच्या औलादीला जातीवर काम देणं मान्य नाही. आजच्या मेळाव्याला 18 पगड जातीचे लोक आले आहेत. तुम्हाला मी दरवर्षा साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या बापाने मरताना माझ्या झोळीत तुमची जबाबदारी टाकली आहे.
सालाबादाप्रमाणे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आज भगवान भक्तिगडावर संपन्न झाला. या मेळाव्याला प्रथमच त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर माजी खासदार सुजय विखे पाटील, ओबीसी आरक्षणासाठी लढणारे लक्ष्मण हाके, वाल्मिक अण्णा कराड आदी नेत्यांची उपस्थिती होती.
मुंडे यांनी छत्रपती उदयनराजेंनी आपल्या देवघरात पूजा करण्याची संधी दिली, असे सांगत छत्रपती घराण्याचे प्रेम मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मात्र, त्या म्हणाल्या, आज समाजात एखाद्या दुर्घटनेत पीडित व आरोपींची जात तपासली जाते. अशा विचारांना विरोध करण्यासाठी आपण सज्ज झाले पाहिजे त्यासाठी माझे आयुष्य समर्पित केले आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत. .
भविष्यातील राजकीय दिशा स्पष्ट करत, त्यांनी पुढील निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्राला प्राधान्य देण्याचे संकेत दिले. ऊसतोड कामगारांना मतदान केल्याशिवाय ऊस तोडायला जाऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मी खोटं बोलत नाही आणि अंधारात कोणाशी गुप्त भेटी घेत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी गावागावात रस्ते निर्माण व विकास कार्याचे वचन दिले.