Air India : मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाच्या (Air India) विमानाला बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर घबराटीचे वातावरण पसरले आहे. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर विमान ताबडतोब दिल्लीच्या (Delhi Airport) दिशेने वळवण्यात आले आहे. न्यूयॉर्कला जाणारे हे विमान दिल्लीच्या IGI (Indira Gandhi International Airport) विमानतळावर उतरवण्यात आले आहे. प्रोटोकॉलनुसार प्रवासी आणि क्रू मेंबर्सची सुरक्षा लक्षात घेऊन विमानाची तपासणी केली जात आहे.
बॉम्बच्या धमकीनंतर न्यूयॉर्कला जाणाऱ्या या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक दिल्लीच्या दिशेने वळवण्यात आले. बॉम्बच्या धमकीनंतर या विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. सध्या सर्व प्रवासी सुरक्षित असून पुढील तपास सुरु आहे.
दिल्ली पोलीस काय म्हणाले?
याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी एक निवेदन सादर केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षेच्या कारणास्तव एअर इंडियाचे विमान दिल्लीकडे वळवण्यात आले आहे. विमान सध्या IGI विमानतळावर आहे आणि प्रवासी आणि क्रू यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी सर्व सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन केले जात आहे.
एअर इंडियाची प्रतिक्रिया
एअर इंडियाच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, 14 ऑक्टोबर रोजी मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या फ्लाइट AI119 ला सुरक्षा अलर्ट मिळाला होता. यानंतर सरकारच्या सुरक्षा नियामक समितीच्या सूचनेनुसार विमान दिल्लीकडे वळवण्यात आले आहे. सर्व प्रवासी विमानातून उतरले असून ते दिल्ली विमानतळाच्या टर्मिनलवर आहेत.
यापूर्वीही मिळाल्या होत्या धमक्या
याआधी ऑगस्टमध्ये मुंबईहून येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात बॉम्बची धमकी देण्यात आली होती. विमानाच्या टॉयलेटमध्ये टिश्यू पेपरवर ‘देअर इज अ बॉम्ब इन फ्लाइट’ असा मेसेज सापडला होता. एअर इंडियाच्या या विमानात 135 प्रवासी होते. यानंतर पायलटने एटीसीला याची माहिती दिली आणि तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणीबाणी घोषित करण्यात आली. या धमकीनंतर तिरुवनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले. मात्र, चौकशीअंती ही धमकी फसवी असल्याचे सिद्ध झाले.
अनेक विमानतळांना बॉम्बच्या धमक्या
याआधीही अनेक विमानतळांना बॉम्बच्या धमक्या आल्या आहेत. जवळपास सर्व धमक्या खोट्या असल्याचे सिद्ध झाले. यापूर्वी 5 ऑक्टोबर रोजी मध्य प्रदेशातील इंदूर येथील देवी अहिल्याबाई होळकर आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी देणारा ईमेल आला होता, त्यानंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवला होता. मेल पाठवणाऱ्याने देशातील इतर विमानतळांवर बॉम्बस्फोट करण्याची धमकीही दिली होती. त्याचप्रमाणे वडोदरा विमानतळावरही 5 ऑक्टोबर रोजी बॉम्बची धमकी देणारा ईमेल आला होता.