Baba Siddique : महाराष्ट्रात अवघ्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन प्रमुख नेते सचिन कुर्मी (Sachin Kurmi) आणि बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांच्या हत्येने मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भायखळा विधानसभा मतदारसंघाचे तालुकाध्यक्ष आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे निकटवर्तीय सचिन कुर्मी यांची 5 ऑक्टोबर रोजी दुचाकीवरून आलेल्या तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. भायखळा पूर्व परिसरात आयोजित एका राजकीय कार्यक्रमाला उपस्थित राहून सचिन कुर्मी आपल्या घरी जात असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होता. मुंबई क्राईम ब्रँचने या प्रकरणाचा तपास हाती घेतला असून, आतापर्यंत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
सचिन कुर्मी हत्याकांडावरून विरोधक सत्ताधारी महायुती सरकारवर हल्लाबोल करत न्यायाची मागणी करत आहेत. दरम्यान, हे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी (baba siddique murder case) यांची 11 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईतील वांद्रे पूर्व भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. त्यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा सुरक्षेचा मुद्दा उपस्थित झाला.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी पोलिसांना आतापर्यंत 6 जणांची ओळख पटली आहे. पोलिसांनी या घटनेनंतर लगेचच दोन हल्लेखोरांना अटक केली होती, त्यांची नावे गुरमेल बलजीत सिंग (23, रा. कैथल, हरियाणा) आणि धर्मराज राजेश कश्यप (19, रा. बहराइच, उत्तर प्रदेश) अशी आहेत.
मुंबई गुन्हे शाखेने रविवारी सायंकाळी दोघांना फोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर केले होते. धर्मराजने आपण अल्पवयीन असल्याचा दावा न्यायालयात केला. दरम्यान, न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गुरमेलला 21 ऑक्टोबरपर्यंत 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, तर धर्मराजचे खरे वय शोधण्यासाठी हाडांच्या अस्थिकरण चाचणीला परवानगी देण्यात आली. पोलिसांनी रविवारी रात्रीच त्याची बोन ऑसीफिकेशन चाचणी केली, लवकरच त्याचा अहवाल समोर येईल. जर धर्मराज प्रौढ ठरला तर पोलीस त्याला पुन्हा दंडाधिकारी न्यायालयात हजर करतील आणि कोठडी किंवा रिमांडची मागणी करतील.
तिसरा हल्लेखोर (शिवकुमार गौतम) उर्फ शिवा हा देखील बहराइचचा रहिवासी असून तो सध्या फरार आहे. मुंबई क्राइम ब्रँचचे डीसीपी दत्ता नलावडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली की, तीन हल्लेखोर बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर मिरचीचा स्प्रे घेऊन पोहोचले होते. बाबा सिद्दिकी यांच्यावर मिरचीचा स्प्रे फवारल्यानंतर त्यांना ठार मारण्याची त्यांची योजना होती, परंतु शिवाने त्यापूर्वीच गोळीबार केला. डीसीपी नलावडे यांच्या म्हणण्यानुसार, फक्त शिवाने गोळी झाडली, त्याच्यासोबत धर्मराज कश्यप आणि गुरमेल उपस्थित होते.
मोहम्मद जसीन अख्तर असे चौथ्या आरोपीचे नाव असून तो पटियाला, पंजाब येथील रहिवासी आहे. त्याचा गुन्हेगारी इतिहास असून या वर्षी ७ जून रोजी पटियाला तुरुंगातून त्याची सुटका करण्यात आली होती. तुरुंगातच तो लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी संपर्कात आला. मुंबई गुन्हे शाखेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जसीन अख्तरने बाबा सिद्दीकीच्या हत्येसाठी धर्मराज, शिवा आणि गुरमेल यांना सामान पुरवले होते. तर शुभम लोणकर आणि प्रवीण लोणकर अशी अन्य दोन आरोपींची नावे आहेत. शुभम लोणकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये या हत्याकांडाची जबाबदारी घेतली होती, तर प्रवीण लोणकर हा त्याचा भाऊ आहे. या प्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला देखील पोलिसांना पुण्यातून अटक केली आहे.
गुन्हे शाखेची 10 पथके फरार आरोपींच्या शोधात
मुंबई क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम उर्फ शिवा ज्या विटांच्या दुकानात काम करायचे, त्याच्या शेजारी प्रवीण लोणकर यांची डेअरी होती. प्रवीण लोणकर आणि त्याचा भाऊ शुभम लोणकर या दोघांनी मिळून शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप यांना हा खून करण्यासाठी साहित्य पुरवले होते. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतल्याची पोस्टशुभम लोणकरने फेसबुकवर टाकली होती. सध्या तो फरार आहे. डीसीपी दत्ता नलावडे यांनी सांगितले की, फरार आरोपींना पकडण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेने 10 पथके तयार केली आहेत. याशिवाय अन्य राज्यांमध्ये या प्रकरणाच्या संदर्भात 15 पथके तपास पुढे नेत आहेत.