Rahul Gandhi : आज राज्यात विधानसभा निवडणूक (Assembly Election Maharashtra) जाहीर होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक होत आहे. या बैठकीसाठी बडे नेते दिल्लीत दाखल झाले असून, राहुल गांधींशी (Rahul Gandhi) महत्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहेत.
या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. हरियाणात मिळालेल्या पराभवाचा धडा घेत काँग्रेस नवीन रणनीती आखणार आहे. त्यासाठीच आज तातडीने ही बैठक बोलवण्यात आली आहे.
कोणते नेते राहणार उपस्थित ?
दिल्लीत पार पडणाऱ्या या बैठकीत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाड, रमेश चेन्नीथला आदी नेते उपस्थित राहणार आहेत. याशिवाय काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गेही उपस्थित राहू शकतात.
हरियाणातील पराभव
काँग्रेस पक्षाने हरियाणामध्ये स्पष्ट विजयाचा अंदाज वर्तवला होता, परंतु काँग्रेस विधानसभेच्या 90 पैकी 37 जागा जिंकल्या तर भाजपला एकूण 48 जागा मिळाल्या. अशा स्थितीत इंडिया आघाडीच्या अनेक नेत्यांनी उत्तरेकडील राज्यातील काँग्रेसच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते आणि पक्षाला आत्मपरीक्षण करण्यास सांगितले होते.
आजची ही बैठक महत्त्वाची का?
काँग्रेसच्या महाराष्ट्र निवडणुकीच्या तयारी बाबत आजची बैठक महत्त्वाची आहे कारण महाविकास आघाडीचे (एमव्हीए) अनेक सदस्य राज्यात निवडणूक लढवण्यासाठी अधिक जागांची मागणी करत आहेत. काँग्रेस, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस हे तीन प्रमुख पक्ष आहेत. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा असून पुढील महिन्यात येथे निवडणुका लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.