Uddhav Thackeray : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. दोन दिवसांपासून अस्वस्थ वाटू लागल्याने उद्धव ठाकरे यांना आज रुग्णालयात नेण्यात आले होते. यावेळी अँजिओग्राफीमध्ये त्यांच्या हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळल्यानंतर तातडीने त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आल्याची माहिती आहे.
नेमकं काय झालं?
उद्धव ठाकरे यांना आज (सोमवारी) सकाळी मुंबईतील प्रसिद्ध एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली. सकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ताबडतोब रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. यामध्ये हृदयाला रक्त पुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये ब्लॉकेज असल्याचे आढळल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दुपारी बारा वाजताच्या सुमारास अँजिओप्लास्टी करण्यात आली.
दरम्यान, उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीबाबत त्यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे. आदित्य ठाकरे यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘आज सकाळी उद्धव ठाकरे यांची सर एचएन रिलायन्स रुग्णालायत पूर्व नियोजित तपशीलवार तपासणी करण्यात आली. तुमच्या शुभेच्छांसह सर्व काही ठीक आहे. ते काम करण्यास आणि लोकांची सेवा करण्यास पूर्णपणे तयार आहेत’
This morning, Uddhav Thackeray ji did a pre planned detailed check up at the Sir HN Reliance Hospital.
With your best wishes, All is well, and he is fully ready to get to work and serve the people.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 14, 2024
शनिवारी दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्कच्या मैदानावर उद्धव ठाकरे यांनी धडाकेबाज भाषण केले होते. त्यानंतर अवघ्या दोन दिवसातच त्यांची प्रकृती बिघडली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांनी ठाकरेंना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. अँजिओप्लास्टीनंतर उद्धव ठाकरेंची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती आहे. याआधी उद्धव ठाकरेंवर २०१२ मध्ये अँजिओप्लास्टी करण्यात आली होती.