Bahraich UP : उत्तर प्रदेशातील बहराइच (Bahraich) शहरात सध्या मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरु आहे. दुर्गा विसर्जनावेळी झालेल्या दगडफेकीत आणि गोळीबारात एका तरुणाचा मृत्यू झाला. यानंतर शहरात जो हिंसाचार पेटला तो आता थांबण्याचे नाव घेत नाहीये. गोळीबारात मृत्यू झालेल्या राम गोपाल मिश्रा याच्या कुटुंबीयांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला असून, शेकडो लोकांनी मृतदेह घेऊन रस्त्यावर उतरून पोलीस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत आरोपींवर कडक कारवाईची मागणी केली आहे. या काळात प्रचंड हिंसाचार आणि जाळपोळ देखील झाली. तसेच परिसरात तणावाची परीस्थिती निर्माण झाली. याच पार्श्वभूमीवर आज तेथील इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारदरम्यान एका हॉस्पिटललाही आग लावण्यात आली आहे.
सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर पोलीस प्रशासन गोळीबारात ठार झालेल्या राम गोपाल मिश्रा याचा मृतदेह घेऊन बहराइच येथील त्याच्या घरी पोहचले. त्याचदरम्यान तेथील संतप्त लोकांनी हातात काठ्या घेऊन तहसीलच्या दिशेने धाव घेत या घटनेचा निषेध केला तसेच घोषणाबाजी केली, यादरम्यान जमावाने मृतदेह रस्त्यावर ठेवला आणि रास्ता रोको आंदोलन देखील केले.
पोलिसांच्या निष्काळजीपणामुळेच राम गोपाल मिश्रा याचा मृत्यू झाल्याचा आरोप येथील लोकांनी केला. यावेळी संतप्त जमावाने अनेक ठिकाणी तोडफोड आणि जाळपोळ केली. आंदोलनादरम्यान संतप्त लोकांनी रुग्णालयाला आग लावली आणि एका गाडीच्या शोरूमला देखील आग लावली.
बहराइच येथील परिस्थितीत नियंत्रणात आणण्याचा पोलीस प्रयत्न करत आहेत. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्तही वाढवला आहे. तसेच काही आंदोलकांना अडवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच शहरातील इंटरनेट देखील बंद करण्यात आले आहे.
दरम्यान, सीएम योगी आदित्यनाथही बहराइच हिंसाचारावर कारवाई करत आहेत. याबाबत मुख्यमंत्री योगी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ताज्या परिस्थितीची माहिती घेतली आहे. सीएम योगींनी आरोपींवर कडक कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गरज भासल्यास लखनऊमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांना बहराइचला पाठवले जाऊ शकते. मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर आमदारांनीही पीडित कुटुंबाला कारवाईचे आश्वासन दिले आहे.
नेमका कुठून सुरु झाला वाद?
बहराइच जिल्ह्यातील महसी तहसीलच्या महाराजगंज शहरात रविवारी संध्याकाळी दुर्गा विसर्जनाच्यावेळी डीजेवर चालू असलेल्या गाण्यावरून वाद झाला. या गाण्याच्या निषेधार्थ इतर समाजातील तरुणांनी छतावरून शिवीगाळ आणि दगडफेक केली. दगडफेकीमुळे दुर्गा मातेच्या मूर्तीची मोडतोड झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे इतर समाजाने विरोध सुरू केला. निदर्शनादरम्यान दुसऱ्या समुदायातील लोकांनी एका तरुणाला घरात पकडून गोळ्या घातल्याचा आरोप आहे. या गोळीबारात रामगोपाल मिश्रा (24, रा. रेहुवा मन्सूर) याचा मृत्यू झाला. त्याला वाचवण्यासाठी आलेला राजन (28) हाही गंभीर जखमी झाला. एवढेच नाही तर आणखी १२ लोक या घटनेत जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. याच घटनेवरून बहराइच येथील वातावरण तापले असून, येथे मोठ्या प्रमाणावर हिंसाचार सुरु आहे.