Donald Trump : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्यावर तिसऱ्यांदा हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबर रोजी कॅलिफोर्नियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत घुसणाऱ्या एका सशस्त्र व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
यासंदर्भात माहिती देताना रिव्हरसाइड काउंटी शेरीफ कार्यालयाने सांगितले की, रॅली सुरू होण्याच्या काही वेळापूर्वी कोचेला येथील अव्हेन्यू 52 आणि सेलिब्रेशन ड्राइव्हच्या चौकात एका चेकपॉईंटवर एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ट्रम्प यांचा हा तिसरा हत्येचा प्रयत्न असावा, असा संशय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, वेम मिलर असे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. रॅलीच्या एंट्री गेटपासून अर्धा मैल अंतरावर असलेल्या चौकात त्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडून बनावट प्रेस आणि व्हीआयपी पास जप्त करण्यात आले आहे.
वेम मिलर हा माजी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचत होता. अशा स्थितीत आणखी एक हत्येचा प्रयत्न हाणून पाडला असल्याचे बोलले जात आहे. मिलरकडून एक लोडेड बंदूक, एक हँडगन आणि मॅगझिन जप्त करण्यात आले आहे.
आरोपी वेम मिलरला 5 हजार डॉलर्सचा जामीन भरल्यानंतर सोडण्यात आले आहे. आता त्याला 2 जानेवारी 2025 रोजी न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.
ट्रम्प यांच्यावर यापूर्वीही हल्ले झालेत
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर याच वर्षी 13 जुलै रोजी हल्ला झाला होता. ज्यात ते थोडक्यात बचावले होते. पेनसिल्व्हेनियातील बटलर येथे निवडणूक रॅलीदरम्यान एक गोळी त्यांच्या कानाला लागून गेली. या हल्ल्यात ते ट्रम्प जखमी झाले होते. हा हल्ला थॉमस क्रुक्स या व्यक्तीने केला होता.
त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे 16 सप्टेंबरला देखील डोनाल्ड ट्रम्प यांच्यवर लक्ष्य करण्यात आले होते. जेव्हा ते फ्लोरिडाच्या गोल्फ कोर्स परिसरात गोल्फ खेळत होते. या प्रकरणी पोलिसांनी रायन वेस्ली रुथ नावाच्या हल्लेखोराला अटक केली होती.