Atul Parchure : मराठी रंगभूमीवर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा हरहुन्नरी कलाकार अतुल परचुरे (Atul Parchure) यांचं निधन आज (१४ ऑक्टोबर) रोजी निधन झालं आहे. गेली दोन वर्ष ते कर्करोगाशी झुंज देत होते. या आजारपणातून बरेही झाले होते मात्र पुन्हा एकदा त्यांची तब्येत बिघडली आणि आज अखेर या आजाराने त्यांना हिरावून घेतलं.
वयाच्या 57 व्या वर्षी अतुल परचुरे यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने संपूर्ण मराठी सिनेविश्वार शोककळा पसरली आहे. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अतुल परचुरे यांनी त्यांच्या अभिनयाची छाप सोडली होती.
अतुल परचुरे यांच्या निधनानंतर त्यांचा जवळचा मित्र आणि जेष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ही अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. मराठी सिनेसृष्टीच्या दृष्टीने अत्यंत वाईट गोष्ट घडली आहे. एक चांगला अभिनेता मराठी सिनेसृष्टीने गमावला आहे. ही सहन करण्यासारखी गोष्ट नाही. असं व्हायला नको होतं. फार छान नट, फार छान मुलगा होता. माझा अत्यंत जवळचा आणि आवडता मित्र होता. एका सिनेमात त्याने माझं लहानपण केलं होतं आणि हे मी विसरुच शकत नाही, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी दिली आहे. यावेळी त्यांना आपले अश्रू अनावर झाले.
मागील अनेक दिवसांपासून अतुल परचुरे हे कर्करोगाशी झुंजत होते. इतकच नव्हे तर त्यांनी कर्करोगावर मात करत रंगभूमीवरचा अंक सुरुच ठेवला होता. त्यांच्या या नव्या अंकाचं अनेकांनी भरभरुन कौतुक केलं होतं. इतकच नव्हे तर त्यांनी नुकतच सुर्याची पिल्ले या नाटकाचीही घोषणा केली होती. मात्र, आज त्यांनी या जगाचा निरोप घेतला.