Lawrence Bishnoi : भारत आणि कॅनडा यांच्यातील राजनैतिक संबंध आता बिघडल्याचे चित्र दिसत आहेत. कॅनडाच्या पोलिसांनी भारतावर नुकताच एक गंभीर आरोप केला आहे. भारताचे एजंट कॅनडामध्ये (Caneda) दहशत पसरवण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई (Lawrence Bishnoi) टोळीसोबत काम करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. एक निवेदन सादर करत त्यांनी भारतावर हे आरोप केले आहेत.
कॅनडाच्या पोलिसांनी दावा केला आहे की, ‘भारत सार्क देशांना लक्ष्य करत आहे. विशेषतः कॅनडातील खलिस्तान समर्थक घटकांना लक्ष्य करत आहेत. आणि यासाठी ते बिश्नोई टोळीसोबत काम करत आहेत.’ असा दावा तेथील पोलिसांनी केला आहे.
कॅनडाच्या पोलिसांनी हा आरोप अशा वेळी केला आहे. जेव्हा लॉरेन्स बिश्नोईची टोळी महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची हत्येच्या आरोपाखाली मुंबई पोलिसांच्या रडारवर आहे. लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीचा पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतही सहभाग होता. आता लॉरेन्स बिश्नोईच्या निशाण्यावर अभिनेता सलमान खान असल्याचे बोलले जात आहे.
31 वर्षीय बिश्नोई हा पंजाबचा गुंड असून तो सध्या अहमदाबादच्या साबरमती सेंट्रल जेलमध्ये आहे. कॅनडाच्या पोलिसांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘भारत सरकारच्या एजंट्सद्वारे केलेल्या गुन्हेगारी कारवायांची महत्वाची माहिती त्यांच्या टीमला मिळाली आहे.’
निवेदनात असेही म्हंटले आहे की, ‘कायद्याची अंमलबजावणी करूनही भारताकडून अशा कारवाया सुरूच आहेत. आता आम्ही अशा टप्प्यावर पोहोचलो आहोत जिथे आम्हाला भारत सरकारशी बोलणे आणि आमच्या तपासातून समोर आलेल्या काही गंभीर निष्कर्षांबद्दल लोकांना माहिती देणे महत्त्वाचे वाटले.’
तुमच्या माहितीसाठी, ‘कॅनडामध्ये हिंसक अतिरेकीचा धोका कायम आहे ज्याचा कॅनडा आणि भारत अनेक वर्षांपासून सामना करत आहेत. तसेच यामुळे कॅनडा आणि भारताच्या संबंधांमध्ये दुरावा येत आहे.
दरम्यान, खलिस्तान समर्थक शीख कट्टरपंथी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येत भारताचा समावेश असल्याचा दावा तेथील पोलिसांनी केला, याच पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी कॅनडाच्या सहा राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्याची घोषणा केली आहे. त्यांना 19 ऑक्टोबर (शनिवार) रात्री पूर्वी भारत सोडण्यास सांगण्यात आले आहे.