J&K CM Oath Ceremony : नॅशनल कॉन्फरन्स (NC) नेते ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) बुधवारी (16 ऑक्टोबर) जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. सोमवारी लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा (Manoj Sinha) यांनी त्यांना 16 ऑक्टोबर रोजी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटरमध्ये शपथविधी सोहळा आयोजित केला जाणार आहे. ओमर अब्दुल्ला बुधवारी सकाळी 11.30 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.
ओमर अब्दुल्ला यांना लिहिलेल्या पत्रात सिन्हा म्हणाले की, ‘जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन करण्यासाठी आणि नेतृत्व करण्यासाठी तुम्हाला आमंत्रित करण्यात मला आनंद होत आहे. पत्रात पूढे लिहिले, 16 ऑक्टोबर 2024 रोजी शेर-ए-काश्मीर इंटरनॅशनल कॉन्फरन्स, श्रीनगर येथे सकाळी 11:30 वाजता शपतविधी सोहळा पार पडले.’
ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळात किती सदस्य असतील?
आता प्रश्न असा निर्माण झाला आहे की ओमर अब्दुल्ला यांच्या मंत्रिमंडळात कोणाला स्थान मिळणार? नॅशनल कॉन्फरन्सच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, नवीन आणि तरुण आमदारांना मंत्रिमंडळात प्राधान्य दिले जाईल. केवळ ओमर अब्दुल्ला हेच मुख्यमंत्रीपदावर राहतील, असे या नेत्याने सांगितले आहे. तर त्यांच्या मंत्रिमंडळात एकूण 9 सदस्य असतील. यापैकी फक्त एक किंवा दोन काँग्रेसचे असतील, बाकीचे ओमर अब्दुल्ला नॅशनल कॉन्फरन्स किंवा आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्षांचे असतील. याशिवाय एनसीच्या वरिष्ठ सदस्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे देखील त्यांनी सांगितले.
जम्मू-काश्मीर मधून राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली
नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस आघाडीने जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुका (JK विधानसभा निवडणूक 2024) जिंकल्या आहेत. विधानसभा निवडणुकीत नॅशनल कॉन्फरन्सने 42 जागा जिंकल्या, तर काँग्रेसला 6 जागा मिळाल्या. निवडणुकीचे निकाल आल्यानंतर ओमर अब्दुल्ला यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झाले. दरम्यान, रविवारी जम्मू-काश्मीरमधून राष्ट्रपती राजवटही हटवण्यात आली आहे. त्यानंतरच आता नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे.