Assembly Elections Jharkhand : निवडणूक आयोगाने आज महाराष्ट्रासोबतच (मंगळवारी) झारखंडमधील विधानसभा निवडणुकीच्या (Jharkhand Assembly Election Date 2024) तारखा जाहीर केल्या आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
धनबादमध्ये २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे. झारखंड विधानसभेचा कार्यकाळ पुढील वर्षी ५ जानेवारीला संपत आहे. झारखंडमध्ये भाजपची ऑल झारखंड स्टुडंट्स युनियन (AJSU) आणि JDU सोबत युती आहे. त्यामुळे हे तीनही पक्ष एकत्र निवडणूक लढवत आहेत. तर भाजप आघाडीची स्पर्धा थेट जेएमएम, काँग्रेस आणि आरजेडी आघाडीशी असेल.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत JMM, काँग्रेस आणि RJD च्या युतीने बहुमत मिळवले होते. या आघाडीने झारखंडमध्ये 81 पैकी 47 जागा जिंकल्या आणि हेमंत सोरेन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. तर भाजपला केवळ 25 जागा मिळाल्या होत्या.
झारखंडमध्ये गेल्या पाच वर्षांत मोठी उलथापालथ झाली जेव्हा मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जानेवारी 2024 मध्ये कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली. अटक होण्यापूर्वी हेमंत सोरेन यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर, JMM संस्थापक शिबू सोरेन यांच्या जवळच्या चंपाई सोरेन यांनी नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
मात्र, हेमंत सोरेन यांची जून महिन्यात जामिनावर सुटका करण्यात आली. यानंतर राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ पाहायला मिळाली. चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर हेमंत सोरेन यांनी झारखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. काही दिवसांनंतर चंपाई सोरेन यांनी JMM चा राजीनामा दिला आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.