Maharashtra Assembly Elections Dates : महाराष्ट्रात विधानसभेच्या (Maharashtra Assembly Elections) 288 जागांसाठी निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराहाष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या तारखेची घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्यात एकाच टप्प्यात निवडणुका होणार असून 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
यादरम्यान निवडणूक आयोगाने राज्यसभा खासदार शरद पवार यांना धक्का दिला आहे. पत्रकार परिषददेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तुतारी आणि पिपाणी चिन्हामुळे लोकसभा निवडणुकीत मोठा गोंधळ झाला होता. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत पिपाणी चिन्ह फ्रीज करणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. अशी मागणी देखील शरद पवार यांच्या पक्षाकडून करण्यात आली होती.
याच प्रश्नाला उत्तर देताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी स्पष्ट केले आहे की, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने 2 मागण्या केल्या होत्या, तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठे करण्याची त्यांनी पहिली मागणी केली होती तर त्यांची दुसरी मागणी पिपाणी (ट्रम्पेट) हे चिन्ह फ्रीज करण्याची करण्याची होती. त्यांची पहिली मागणी आम्ही पूर्ण केली आहे, आम्ही त्यांना लिखित स्वरूपात विचारले होते की तुमचे चिन्ह तुम्हाला कसे हवे आहे ते सांगावे. त्यानुसार त्यांच्या चिन्हाच्या आकारात बदल केला आहे. पण पिपाणी हे चिन्ह पूर्ण वेगळं आहे. त्याला आम्ही हात लावला नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे.