Droupadi Murmu : भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात त्यांनी अल्जेरियाला भेट दिली, तिथे त्यांना सिदी अब्देल्लाह सायन्स अँड टेक्नॉलॉजी पोल युनिव्हर्सिटीने राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवीने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमावेळी त्यांनी उपस्थितांना संबोधित देखील केले. तसेच भारतीय कंपन्यांना अल्जेरियन अर्थव्यवस्थेच्या चौकटीत गुंतवणूक करत राहण्याचे आवाहन देखील केले.
या कार्यक्रमात मुर्मू यांनी आफ्रिकन राष्ट्राची वेगवान वाढ आणि विस्तारणारी अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध करून देते यावर भर दिला. अल्जेरियन-इंडियन इकॉनॉमिक फोरमला संबोधित करताना, राष्ट्रपतींनी व्यवसाय सुलभतेच्या क्षेत्रात भारताच्या वेगवान उदय आणि प्रभावी प्रगतीवर भर दिला आणि अल्जेरियन कंपन्यांना भारताच्या मेक इन इंडिया आणि मेक फॉर द वर्ल्ड उपक्रमात सामील होण्यासाठी प्रोत्साहित केले.
अल्जेरियन इकॉनॉमिक रिन्यूअल कौन्सिल आणि फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलताना मुर्मू म्हणाल्या, ‘भारत-अल्जेरिया संबंधांचे भविष्य ही आमची सामायिक मूल्ये, समान आव्हाने आणि परस्पर विश्वास यावर आधारित आहेत. अल्जेरियाची वेगवान वाढ आणि विस्तारणारी अर्थव्यवस्था यामुळे विविध क्षेत्रांमध्ये अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत.
पुढे अल्जेरियात राज्यशास्त्रातील मानद डॉक्टरेट पदवीने त्यांना सन्मानित केल्यानंतर, त्यांनी ओडिशाच्या मध्यभागी घालवलेल्या त्यांच्या बालपणाबद्दल सांगितले. यावेळी त्या म्हणाल्या, ‘माझे बालपण आव्हाने आणि अडथळ्यांनी भरलेले होते, मी माझे प्रारंभिक शिक्षण स्थानिक प्राथमिक शाळेत केले आणि नंतर उच्च शिक्षणासाठी भुवनेश्वरला गेले. पुढे त्या म्हणाल्या, मी रमादेवी महिला महाविद्यालय, भुवनेश्वर येथून पदवी प्राप्त केली आणि या विद्यापीठातून पदवीधर होणारी त्यांच्या गावातील त्या पहिल्या महिला ठरल्या. त्या पुढे म्हणल्या, राजकारणात येण्यापूर्वी मी लिपिक आणि शिक्षिका म्हणून देखील काम केले आहे. शिक्षण आणि सक्षमीकरणाची त्यांची आवड हीच त्यांच्या आयुष्यातील प्रेरक शक्ती आहे. असेही त्या म्हणाल्या.
अल्जेरियातील आपल्या भाषणादरम्यान त्या म्हणल्या, ‘मी आदिवासी समुदायातील पहिली व्यक्ती आहे आणि भारतीय प्रजासत्ताकाचे सर्वोच्च पद भूषवणारी सर्वात तरुण व्यक्ती आहे. तंत्रज्ञान आणि महिलांच्या नेतृत्वाखालील वाढ हा भारताच्या जलद आर्थिक पुनरुत्थानाचा प्रमुख आधारस्तंभ आहे. भारतात मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या डिजिटल परिवर्तनामुळे महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागाला प्रोत्साहन मिळाले आहे. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या ४.४ दशलक्ष व्यावसायिकांपैकी ३६ टक्के महिला आहेत. असेही त्यांनी आपल्या भाषणात पुढे म्हंटले आहे.