Amit Shah : महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) निवडणुकांचे बिगुल वाजले असून, मंगळवारी दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली आहे.
दरम्यान, याच पार्श्वभूमीवर राज्यातील पक्षांकडून जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे. तसेच राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीने देखील विधानसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती की महाविकास आघाडी यापैकी कोण बाजी मारणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.
अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून एक महत्त्वाचे विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महायुतीत मुख्यमंत्रिपदावरुन वाद सुरु आहे. अशातच आता अमित शाह यांचे वक्तव्य चर्चेत आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने केंद्रीय मंत्री अमित शाहांच्या महाराष्ट्रातील नेत्यांसोबत महत्त्वाच्या बैठका पार पडत आहेत. यातील एका बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून एक विधान केले आहे.
मुख्यमंत्रीपदावेळी आम्ही त्याग केला, आता तुम्ही झुकते माप घ्या, असा सल्ला अमित शाह यांनी एकनाथ शिंदेना दिला आहे. सध्या याच विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
“शिंदेजी देशात पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि तहसीलदार अशी काही महत्त्वाची पदे आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सर्व पदं फक्त व्यवस्था आहेत. ती काम पूर्ण होण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्रिपद दिलं. तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला, असं शहांनी शिंदेंना बैठकीदरम्यान सुचवले आहे.
अमित शाह यांच्या या विधानामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला जागावाटपात तडजोड करावी लागणार का? अशी चर्चा आता रंगत आहे. अशातच जर आता महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आले तर मुख्यमंत्री पद कोणाला दिले जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे. दरम्यान, आज दुपारी महायुतीची पत्रकार परिषद असून, यामध्ये जागा वाटपाबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.