Maharashtra Assembly Elections 2024 : महाराष्ट्रात विधानसभा (Assembly Elections) नवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होत असून, येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. मंगळवारी दुपारी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी या निवडणुकीची घोषणा केली आहे.
राज्यात निवडणुकीची तारीख जाहीर होताच आज महायुतीची पत्रकार परिषद पार पडत आहे. या पत्रकार परिषदेत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस उपस्थित आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी लाडकी बहीण योजनेसोबतच सरकारच्या कामाचा रिपोर्टकार्ड सादर केला आहे.
अजित पवार म्हणाले, महत्वाच्या गोष्टी रिपोर्टकार्डमध्ये आहे. क्रीडा, सांस्कृतिक विकास, ग्रामिण विकास आणि रोजगार या सर्व गोष्टी आम्ही समाविष्ट केल्या आहेत. दोन अडीच वर्षाच्या कामगिरीचा अहवाल आम्ही देत आहोत. आमचा 2022 ते 2024 चे रिपोर्ट कार्ड देत आहोत. महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यात आणलेल्या बदलाचा हा अहवाल आहे. शेतकरी, महिला, कष्टकरी या सर्वांच्या आयुष्यात बदल घडवण्यासाठी आम्ही मेहनत घेतली आहे. त्याचा लेखाजोखा आम्ही आज मांडत आहोत. आम्ही चांद्यापासून बांद्यापर्यंत या गोष्टी पोहोचवण्याचे काम करत आहोत. आम्ही जनतेचे जीवन बदलण्याचा प्रयत्न केला आहे. असे अजित पवार म्हणालेत.
पुढे राज्यातील सर्वात चर्चेतील लाडकी बहीण योजनेविषयी बोलताना अजित पवार म्हणाले, सुशील कुमार शिंदे यांनी वीज बिल माफ केले आणि नंतर पुन्हा सुरू केले. आम्ही अशा गोष्टी करणार नाही. लाडकी बहीण योजना ही सुरूच राहणार आहे. असा विश्वास त्यांनी यावेळी जनतेला दिला आहे.