Omar Abdullah : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) तब्बल 10 वर्षानंतर नवीन सरकार स्थापन झाले आहे. नॅशनल कॉन्फरन्सचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शपथ घेण्यापूर्वी ओमर अब्दुल्ला यांनी शेख मुहम्मद अब्दुल्ला यांच्या स्मारकावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सहभागी झालेला नाही. काँग्रेसने उमर सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
ओमर अब्दुल्ला यांच्यासह सुरिंदर चौधरी, जावेद दार, सकीना इट्टू, जावेद राणा आणि सतीश शर्मा यांना नॅशनल कॉन्फरन्सकडून मंत्री करण्यात आले आहे. तर सुरिंदर चौधरी यांना उपमुख्यमंत्री बनवण्यात आले आहे. आजच्या कार्यक्रमाला मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, केसी वेणुगोपाल, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव यांनी हजेरी लावली.
उपमुख्यमंत्री बनलेले सुरिंदर चौधरी कोण आहेत?
या निवडणुकीत सुरिंदर चौधरी यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते रवींद्र रैना यांचा पराभव केला. सुरिंदर चौधरी हेही यापूर्वी पीडीपीमध्ये होते. 2014 मध्येही सुरिंदर चौधरी यांनी नौशेरामधून निवडणूक लढवली होती. मात्र तिथे रवींद्र रैना 10 हजार मतांनी विजयी झाले होते.
#WATCH उमर अब्दुल्ला ने जम्मू-कश्मीर के मुख्यमंत्री के रूप में शपथ ली।
लोकसभा में विपक्ष के नेता राहुल गांधी, कांग्रेस नेता प्रियंका गांधी वाड्रा, JKNC प्रमुख फारूक अब्दुल्ला, समाजवादी पार्टी प्रमुख अखिलेश यादव, PDP प्रमुख महबूबा मुफ्ती, AAP नेता संजय सिंह, CPI नेता डी राजा सहित… pic.twitter.com/3CoXSIWVsz
— ANI_HindiNews (@AHindinews) October 16, 2024
ओमर अब्दुल्ला यांच्यासोबत सकिना इट्टू यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दक्षिण काश्मीरमधील कुलगामच्या डीएच पोरा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली. 1996 मध्ये पहिल्यांदा निवडणूक जिंकण्यात त्या यशस्वी झाल्या होत्या. त्यावेळी त्या विधानसभेच्या सर्वात तरुण सदस्य होत्या. सकीना इट्टू या आधीही मंत्री होत्या. समाजकल्याण आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री अशा खात्यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या आहेत.
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते जावेद अहमद दार रफियााबाद मतदारसंघातून निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले आहेत. जावेद अहमद दार 9 हजार 202 च्या फरकाने विजयी झाले. जावेद दार जिथून निवडणूक जिंकून विधानसभेत पोहोचले ती जागा नॅशनल कॉन्फरन्सचा बालेकिल्ला मानली जाते.
जावेद अहमद राणा यांनाही ओमर अब्दुल्ला यांच्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे. जावेद अहमद राणा हे पीर पंजाल रेंजसाठी नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष आहेत. राणा हे नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते आहेत. मात्र, 2019 मध्ये पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर खूप टीका झाली होती.
सतीश शर्मा अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभेत पोहोचले होते. मात्र निवडणूक निकालानंतर त्यांनी नॅशनल कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला. निवडणुकीत सतीश शर्मा यांनी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राजीव शर्मा यांचा पराभव केला.