Supreme Court : सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) एक मोठा निर्णय घेतला आहे. आता ‘लेडी ऑफ जस्टिस’ (Lady Justice Description) म्हणजेच न्यायदेवतेचा नवा पुतळा सर्वोच्च न्यायालयात बसवण्यात आला आहे. नवीन पुतळ्याच्या डोळ्यावरची काळी पट्टी आता काढून टाकण्यात आली आहे. जी आतापर्यंत कायदा आंधळा असल्याचे दर्शवत होते. यासोबतच मूर्तीत आणखी एक बदल करण्यात आला आहे, न्यायमूर्तींच्या हातात आता तलवारीऐवजी संविधानाचे पुस्तक देण्यात आले आहे. हा नवा पुतळा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या वाचनालयात बसवण्यात आला असून, ‘कायदा आंधळा नसून सर्वांसाठी समान दृष्टी ठेवणार आहे’ असा संदेश देणारा आहे.
सरन्यायाधीश न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांनी ऑर्डर देऊन ही नवी मूर्ती बनवली आहे. मूर्तीत बदल करण्यामागे एक महत्वाचा संदेश देण्यात आला आहे. नवीन मूर्तीद्वारे देशातील कायदा आंधळा नाही आणि तो शिक्षेचे प्रतीक नाही, असा संदेश देण्यात आला आहे. तसेच जुन्या मूर्तीच्या डोळ्यावर असलेली काळी पट्टी कायद्याच्या नजरेत सर्व समान असल्याचे दर्शवत होती. तर तलवार हे अधिकाराचे आणि अन्यायाला शिक्षा देण्याच्या सामर्थ्याचे प्रतीक होते.
दरम्यान, मूर्तीच्या उजव्या हातात तराजू तसाच ठेवण्यात आला आहे, कारण ते समाजातील संतुलनाचे प्रतीक आहे. तराजू दर्शवते की न्यायालय निष्कर्षापर्यंत पोहोचण्यापूर्वी दोन्ही बाजूंचे तथ्य आणि युक्तिवाद पाहते आणि ऐकते.
सरन्यायाधीश (CJI) DY चंद्रचूड यांनी नवीन मूर्तीच्या संकल्पनेवर सांगतिले की, ‘न्याय नेहमीच न्याय्य असतो आणि तो प्रत्येकाशी समानतेने वागला पाहिजे. त्यामुळे न्यायदेवतेच्या डोळ्यांवरील पट्टी काढून राज्यघटनेचे पुस्तक त्यांच्या हाती देण्यात आले आहे. आता तलवारीच्या धाकाने नव्हे तर राज्यघटनेनुसारच न्याय मिळणार असल्याचे त्यांनी म्हंटले आहे.’
जुन्या आणि नवीन पुतळ्यात काय फरक आहे?
पारंपारिकपणे न्यायदेवतेच्या डोळ्यावर काळी पट्टी बांधली गेली कारण ती कोणताही भेदभाव न करता निष्पक्ष न्याय देते. तसेच एका हातात तराजू देण्यात आला, जो न्याय आणि समतोल यांचे प्रतीक होता आणि दुसऱ्या हातात तलवार होती, जी शक्ती आणि शिक्षा करण्याचा अधिकार दर्शवते.
पण आता नवीन मूर्तीच्या डोळ्याची पट्टी काढली आहे. हे प्रतीक आहे की, न्याय आंधळेपणाने पाहत नाही तर सर्वांना समानतेने पाहतो. मूर्तीच्या हातात तराजू कायम आहे. तर दुसऱ्या हातात तरवारी ऐवजी राज्यघटना देण्यात आली आहे, जे अधोरेखित करते की न्याय हा भीती किंवा शक्तीच्या आधारावर नाही. तर कायद्याच्या आधारावर दिला जाणार आहे.
न्यायदेवतेचा नवा पुतळा फक्त सुप्रीम कोर्टात बसवण्यात आला आहे. पण देशभरातील इतर कोर्टात ही कल्पना त्वरीत राबवली जाऊ शकते. कायदा आणि न्याय यापुढे आंधळे राहणार नाहीत. हे दाखवणारा हा बदल भारताच्या न्यायव्यवस्थेतील एक टर्निंग पॉइंट आहे. या नव्या पुतळ्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नवा विचार आणि दृष्टिकोन स्वीकारला आहे.