Bahraich : उत्तर प्रदेशातील बहराइच (Bahraich) जिल्ह्यात घडलेल्या घटनेतील दोन आरोपी समोर आले असून, आरोपी नेपाळला पळून जाण्याच्या बेतात होते. घटनेच्या दिवसापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. आज पोलिसांना त्यांचा शोध लागला असून, पोलीस त्यांच्या मागावर होते. सरफराज उर्फ रिंकू आणि फहीम अशी या आरोपींची नावे आहेत. पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत दोघेजण जखमी झाले असून, त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
चकमकीसंदर्भात पोलिस मुख्यालयात सध्या मोठी बैठक सुरू असून, या बैठकीस एडीजी कायदा आणि सुव्यवस्थेसह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित आहेत. या प्रकरणात अद्याप जीवितहानी झालेली नसून पोलिसांनी पाच आरोपींना पकडले असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एकूण ५ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामधील दोन आरोपींना चकमकीत गोळ्या लागल्या आहेत.
जखमी आरोपींवर सध्या उपचार सुरु आहेत. दोघांच्याही पायात गोळी लागली आहे. एकाला उजव्या पायाला तर दुसऱ्याला डाव्या पायाला गोळी लागली आहे. दोन्ही आरोपींना आता जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
बहराइच हिंसाचारात मारला गेलेला राम गोपाल मिश्रा याच्या हत्येमध्ये हे आरोपी सहभागी असल्याचे सांगण्यात येत आहे. सरफराजने त्याच्या साथीदारांसह राम गोपाल याच्यावर गोळीबार केला होता. घटनेच्या वेळचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये अब्दुल हमीदच्या (आरोपी हमीद आणि सरफराजचे वडील) टेरेसवर चार ते पाच लोक दिसत आहेत. जिथे रामगोपालला गोळी घालण्यात आली.
प्रकरण काय आहे?
बहराइचमधील हरदी पोलीस स्टेशन क्षेत्रातील रेहुआ मन्सूर गावातील रहिवासी राम गोपाल मिश्रा रविवारी संध्याकाळी ६ वाजता दुर्गा मूर्तीच्या विसर्जनाच्या मिरवणुकीत सहभागी झाला होता. महाराजगंज बाजारपेठेतून दुर्गा देवीची मिरवणूक जात असताना इतर समाजातील लोकांनी दगडफेक केली, त्यावेळी दोन्ही समाजामध्ये बाचाबाची झाली. यावेळी छतावरून दगडफेक सुरू झाल्याने विसर्जनाच्या वेळी गोधंळ झाला.
यादरम्यान दुसऱ्या समुदायातील लोकांनी एका तरुणाला घरात पकडून गोळ्या घातल्या. या गोळीबारात रामगोपाल मिश्रा (24, रा. रेहुवा मन्सूर) याचा मृत्यू झाला. याच घटनेवरून बहराइच येथील वातावरण तापले आणि रामगोपाल मिश्रा याला न्याय मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. या प्रकरणातील आरोपी आता पकडले गेले असून, पुढील कारवाई सुरु आहे.