Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे (Assembly Election 2024) बिगुल वाजले असून, राज्यामध्ये आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यात एकाच टप्प्यात निवडणूक होत होणार आहेत. येत्या 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडेल. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत.
महारष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. झारखंडमध्ये निवडणुका दोन टप्प्यात होणार असून १३ आणि २० नोव्हेंबर रोजी येथे मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
यातच आता आम आदमी पक्षाने महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक लढणार नसल्याचे समोर आले आहे. हरियाणा विधानसभेच्या निवडणूकांमध्ये पराभवाचा सामना केल्यानंतर आता, आम आदमी पार्टीने झारखंड आणि महाराष्ट्र मध्ये पार पडणाऱ्या विधानसभा निवडणूकांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. हरियाणा मध्ये ‘आप’ ला लोकांनी प्रतिसाद दिला नसून, पुढच्या वर्षी होणाऱ्या दिल्लीच्या नगरपरिषदेच्या निवडणूकांसाठी तयारी करणार असल्याचे मत, आपच्या वरिष्ठ नेत्यांनी व्यक्त केले आहे.
हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहेत. अशा स्थितीत महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू नये, यासाठी ही काळजी घेतली जात आहे. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचे बोलले जात आहे.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत आपला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागत होता. आपने हरियाणात 88 जागांवर उमेदवार उभे केले होते. मात्र, ते येथे खाते उघडू शकले नाही. अशा स्थितीत त्यांनी महाराष्ट्र आणि झारखंड निवडणुकीतून माघार घेतली असल्याचे बोलले जात आहे.