Kamala Harris : अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. अशातच डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी गुरुवारी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांच्या आरोग्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
कमला हॅरिस यांच्या कॅम्पेन टीमने डोनाल्ड ट्रम्प यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ डोनाल्ड ट्रम्प यांच्या नुकत्याच झालेल्या प्रचार कार्यक्रमाचा आहे. ज्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प थोडेसे थकलेले दिसत आहेत. या व्हिडिओला लक्ष्य करत कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या आरोग्यावर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि लिहिले की, ‘ट्रम्प या रॅलीत थकलेले दिसत आहेत. ते रॅली मधेच सोडून गेले. मला आशा आहे की त्यांची तब्येत ठीक असेल.’
फिलाडेल्फिया येथे आयोजित एका रॅलीत ट्रम्प त्यांच्या समर्थकांनी अर्थव्यवस्थेवर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत होते. या काळात रॅलीत काही वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्याने प्रश्नोत्तरे काही काळ थांबली होती. दरम्यान, प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी गाणी वाजण्यास सुरुवात झाली. मात्र ही गाणी ३० मिनिटांपेक्षा जास्त वेळ वाजत राहिल्याने आश्चर्याचा धक्का बसला. याचदरम्यान, ट्रम्प यांनी प्रश्न-उत्तर सत्र मधेच संपवले. यामुळेच कमला हॅरिस यांनी ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दरम्यान, ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्या आरोग्यावर अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा स्थितीत बायडेन यांना अध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घ्यावी लागली होती. आता ट्रम्प स्वतः त्यांच्या प्रकृतीबाबत अडचणीत आले आहेत.
याचदरम्यान, कमला हॅरिस यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांचे वैद्यकीय तपासणी अहवाल सार्वजनिक करण्याचे आव्हान दिले आहे. हॅरिस म्हणाल्या की, मी’ माझे वैद्यकीय रेकॉर्ड जारी केले आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांनीही तेच करायला हवे.’
या वर्षी ऑगस्टमध्ये एका पत्रकाराने डोनाल्ड ट्रम्प यांना वैद्यकीय अहवाल सार्वजनिक करण्यास सांगितले होते. यावर ट्रम्प यांनी वैद्यकीय अहवाल आनंदाने जाहीर करणार असल्याचे सांगितले होते. पण त्यांनी अजूनही याबाबत एकही अहवाल सादर केलेला नाही. मात्र कमला हॅरिस यांनी त्यांचे वैद्यकीय अहवाल जाहीर केले आहेत. अशातच आता त्यांच्यावर वैद्यकीय अहवाल सादर करण्याचा दबाव आणला जात आहे.