Salman Khan : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईच्या (Lawrence Bishnoi) टोळीने स्वीकारली आहे. सिद्दीकीच्या हत्येनंतर आता बॉलिवूड अभिनेता सलमानच्या अडचणी वाढल्या आहेत. सिद्दीकीनंतर सलमान खानच्या जीवाला देखील धोका असल्याचे सांगण्यात येत आहेत.
सिद्दीकीच्या मृत्यूला काहीच दिवस झाले असून, अभिनेता सलमान खानला बिश्नोई टोळीकडून पुन्हा एकदा धमकी देण्यात आली आहे. यावेळी सलमान खानला ही धमकी मुंबई वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून पाठवण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांना पाठवण्यात आलेल्या एका मेसेजमध्ये सलमानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
सलमान खानसाठी पाठवलेल्या मेसेजमध्ये लिहिले आहे, जर हे जुने वैर संपवायचे असेल तर सलमानला बिश्नोई गँगला ५ कोटी रुपये द्यावे लागतील, आणि जर ही धमकी हलक्यात घेतली तर बिश्नोई गँग सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट करेल. असा मेसेज पाठवण्यात आला आहे. सलमानला हा धमकीचा संदेश मिळताच मुंबई पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. सलमान खानला देण्यात आलेली ही धमकी मुंबई वाहतूक पोलिसाच्या व्हॉट्सॲप नंबरवर देण्यात आली आहे.
बाबा सिद्दीकीच्या मृत्यूनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली असून, या आठवड्यात सलमान खान बिग बॉस 18 च्या वीकेंड का वारसाठी देखील शूटिंग करणार नाही. सलमान खानला मिळत असलेल्या या धमक्यांमुळे त्याला जास्तीत जास्त वेळ घरी घालवण्यास सांगितले आहे.