Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी (Baba Siddique) यांची १२ ऑक्टोबर रोजी गोळी घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता केंद्रीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अशातच केंद्रीय यंत्रणा खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांना झेड प्लस सुरक्षा देण्याबाबत त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधणार आहे. याआधीही केंद्राने शरद पवार यांना झेडप्लस सुरक्षा दिली होती. मात्र, शरद पवारांनी ती नाकारली होती.
सिद्दिकी यांची वांद्रे पूर्व इथे गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येची जबाबदारी बिश्नोई टोळीने स्विकारली असून, आता राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. सिद्दिकी हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर सिद्दिकी यांची हत्या झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. अशातच आता देशातील केंद्रीय यंत्रणा सावध झाल्या आहेत. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर अभिनेता सलमान खान याच्या देखील सुरक्षिततेत वाढ करण्यात आली आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार यांना केंद्र सरकारकडून झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, शरद पवार यांच्या जीवाला धोका असून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पवारांनी सुरक्षा नाकारली होती. यासंबंधित दिल्लीत देखील बैठक घेण्यात आली होती. मात्र, तेथेही पवारांनी सुरक्षा न घेण्याचा निर्णय दिला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा शरद पवार यांना सुरक्षा घेण्यासाठी केंद्रीय यंत्रणा आग्रह करणार असल्याचे बोलले जात आहे.
राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले असून, आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सिद्दिकी यांची हत्या करण्यात आल्याने आता सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.