Jharkhand Assembly Elections 2024 : महारष्ट्रासोबतच झारखंड विधानसभा (Jharkhand Assembly Elections) निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, १३ आणि २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
अशातच आता झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएमध्ये जागावाटप जाहीर करण्यात आले आहे. आज भाजप आणि AJSU ने रांची येथील प्रदेश भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि जागावाटपाची घोषणा केली आहे. झारखंडमध्ये एनडीएमध्ये भाजप 68, AJSU-10, JDU- 2 आणि LJP (रामविलास) पक्ष 1 जागेवर निवडणूक लढवणार आहे. झारखंड भाजपचे सहप्रभारी आणि आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही माहिती दिली आहे.
झारखंड भाजपचे प्रभारी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान जागावाटपाची घोषणा करताना म्हणाले, भाजप-JDU-AJSU आणि LJP (R) झारखंड विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार आहेत. तसेच पक्षांमध्ये जागा वाटप करण्यात आले असून उमेदवारही लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माहितीनुसार, झारखंड विधानसभेच्या ज्या १० जागांवर AJSU निवडणूक लढवणार आहे त्यात सिल्ली, रामगढ, गोमिया, इचागड, मांडू, जुगसालिया, डुमरी, पाकूर, लोहरदगा, मनोहरपूर यांचा समावेश आहे. तर जेडीयू जमशेदपूर पश्चिम आणि तामर मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहे. चतरा विधानसभेची जागा चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखालील एलजेपी रामविलास यांना देण्यात आली आहे.
झारखंडमध्ये दोन टप्प्यात मतदान
झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी 13 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. पहिल्या टप्प्यात राज्यातील विधानसभेच्या 43 जागांवर मतदान होणार असून दुसऱ्या टप्प्यात 38 जागांवर मतदान होणार आहे. झारखंडमध्ये, एनडीएचा सामना JMM-नेतृत्वाखालील इंडिया आघाडीशी होईल, ज्यामध्ये JMM, काँग्रेस, RJD यांचा समावेश आहे.